मध्य वैतरणा जलाशयाच्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून तयार झालेली वीज मुंबईसाठी देणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 September 2016

मध्य वैतरणा जलाशयाच्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून तयार झालेली वीज मुंबईसाठी देणार - मुख्यमंत्री

पालघर, दि.1 : मध्य वैतरणा जलाशयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून तयार झालेली वीज मुंबईसाठी देण्यात येईल व हा प्रकल्प मुंबई महानगरपालिकाच संचलित करेल असा निर्णय झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच स्थलांतरणाच्या प्रश्नाबाबतही शासन सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालघर जिल्हयातील मोखाडा तालुक्यातील कोचाळेगांव येथे मध्य वैतरणा जलाशयाचे हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय असे नामकरण करण्यात आले. या नामकरण सोहळ्यास शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, मुंबई मनपाच्या महापौर स्नेहल आंबेकर, युवा नेते आदित्य ठाकरे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यासह लोकप्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांच्या विचारामुळे समाजकारणासाठी ऊर्जा व प्रेरणा मिळायची. ते नेहमीच मार्गदर्शक व प्रभावी असे नेतृत्व होते. त्यांच्या आचार-विचारांचा अंगीकार आम्ही समाजकारणात करीत आहोत. त्यांचे नाव या जलाशयाला देणे हे आमच्यासाठी आनंददायी गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात सामान्यांचे राज्य आले पाहिजे, अशी शिवसेनाप्रमुखांची विचारधारणा होती. तसेच सामान्यांना प्रेरित करून त्यांच्यामध्ये ऊर्जा जागृत करून त्यांनी समाजाधिष्ठीत राजकारणाला प्राधान्य दिले. प्रचंड नेतृत्व क्षमता असलेल्या या नेत्याने राजकारणाची उंची कायम ठेवण्याची परंपरा सुरु केली, असे फडणवीस यांनी सांगितले.

पाच पाण्याचे स्त्रोत असणारी मुंबई मनपा ही एकमेव महानगरपालिका असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यामध्ये जलाशयाचे प्रकल्प उभारताना ज्या गावांच्या जमिनी दिल्या जातात. त्या गावांना पाणी मिळणे आवश्यक आहे. यासाठी आपण वॉटर ग्रीड तयार करण्यावर भर देणार आहोत. सध्या पाणी प्रश्न हा संघर्षाचा विषय बनला आहे. सामान्य माणूस व उद्योजक या दोघांनाही पाण्याची आवश्यकता आहे. राज्य शासन पिण्यासाठी शुध्द व निर्मळ पाणी तर उद्योगांना प्रक्रिया केलेले पाणी देण्यासाठी विचाराधीन आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

मध्य वैतरणा जलाशय हे पालघर जिल्हयाच्या हद्दीत येत असून तेथील स्थानिकांना पाणी देण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत महानगरपालिकेशी विचार विनिमय करून लवकरच मार्ग काढण्यात येणार असून पालघर जिल्ह्यातील स्थलांतरणाचे प्रमाण रोखण्यासाठी किमान कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मुंबईसाठी जीवनदायी असलेला हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन केले.

शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे म्हणाले की, या जलाशयाची भुमिपुजनापासून संपूर्ण जडणघडण मी प्रत्यक्ष पाहतो आहे. त्यामुळे आज या धरणाच्या नामकरणामुळे शिवसेना प्रमुखांची प्रकर्षाने आठवण येते आहे. शिवसेना प्रमुख हे उर्जेचे स्त्रोत होते.त्यामुळे या जलाशयाच्या ठिकाणी मुंबई मनपाचे वीजनिर्मिती केंद्र व्हावे व तशी परवानगी शासनाने द्यावी . त्यामुळे शिवसेना प्रमुखांचे या प्रकल्पाला दिलेले नाव सार्थ होईल. असा मानस ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

महापौर स्नेहल आंबेकर यांनी यावेळी सांगितले की, मुंबई शहराला प्रति दिन ४५५ लीटर दशलक्ष पाणीपुरवठा करण्यासाठी आरसीसी पध्दतीने हे धरण बांधण्यात आले आहे.जगातील जलदगतीने बांधण्यात आलेल्या धरणांपैकी नवव्या क्रमांकाचे हे धरण आहे. अशा या जागतिक किर्तीच्या जलाशयाला हिंदु हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सार्थ आहे. मुंबई महानगरपालिका नेहमीच आव्हानात्मक कामांच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवत असते हे या प्रकल्पाच्या उभारणीच्या कामातून सिध्द होते.

प्रारंभी या जलाशयाच्या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी आपल्या प्रास्ताविकात या प्रकल्पा विषयी सविस्तर माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad