शेतकऱ्यांसाठी सुलभ व प्रभावी विमा योजना सुरू कराव्यात - राज्यपाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 September 2016

शेतकऱ्यांसाठी सुलभ व प्रभावी विमा योजना सुरू कराव्यात - राज्यपाल

मुंबई, दि. 16 : राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व दुष्काळासारख्या कठिण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी विमा कंपन्यांनी राज्य शासनाबरोबर सहकार्य करून शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या दरात, सुलभपणे उपलब्ध होईल आणि प्रभावी असे विम्याचे पर्याय उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
असोचेमच्या वतीने बांद्रा येथील ताज लँडस् एन्ड येथे आयोजित 9 व्या जागतिक विमा परिषदेत राज्यपाल विद्यासागर राव बोलत होते. यावेळी‘असोचेम’चे अध्यक्ष सुनील कनोरिया, ‘असोचेम’च्या विमा परिषदेचे अध्यक्ष जी. श्रीनिवासन, विमा नियामक व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष टी. एस. विजयन, ‘एलआयसी’चे अध्यक्ष एस. के. राव, ‘असोचेम’चे महासचिव डी. एस. रावत आदी उपस्थित होते.

राज्यपाल राव म्हणाले की, समाजातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासन अनेक योजना राबवित आहे. अटल पेन्शन योजना,प्रधानमंत्री सुरक्षा जीवन विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना व आरोग्य विमा यासारख्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक विमा योजना मध्यम व कनिष्ठ मध्यमवर्गासाठी कमी दराच्या हप्त्यांत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी विमा कंपन्यांनी शासनास सहकार्य करावे.

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून पिक विमा योजना सुरू केली आहे. अशाच प्रकारच्या योजना कंपन्यांनीही सुरू कराव्यात, असे आवाहन करुन राज्यपाल म्हणाले की, नव उद्योगांसाठी केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे. या उद्योगांनाही विम्याचे कवच उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा. समाजातील दुर्बल व मध्यमवर्गातील नागरिक, शेतकरी, असंघटित कामगार, विद्यार्थी यांच्यासाठीही विविध परवडणाऱ्या नाविन्यपूर्ण विमा योजना सुरू कराव्यात.

Post Bottom Ad