मुल्यवर्धित कर आकारणीत बदल करण्याचा निर्णय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 September 2016

मुल्यवर्धित कर आकारणीत बदल करण्याचा निर्णय

मुंबई - राज्यातील मुल्यवर्धित करांतर्गत स्टॅंडर्ड कराचा दर 12.5 टक्क्यांवरुन 13.5 टक्के तर निम्न कराचा दर 5.5 टक्क्यांवरुन सहा टक्के करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. तसेच पेट्रोल वरील विक्रीकराचा दर दीड रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आला असून डिझेलच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पेट्रोलवरील वाढीव करदरानंतरही राज्यातील पेट्रोलची किरकोळ विक्री किंमत जवळपास जून 2016 मधील विक्री किंमतीइतकीच असणार आहे.
राज्याचा सर्वांगीण विकास व लोककल्याण यासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांकरिता आवश्यक निधीच्या उभारणीसाठीविक्रीकराच्या दरामध्ये काही प्रमाणात वृद्धी करणे आवश्यक ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मूल्यवर्धित करांतर्गत स्टँडर्ड कराचा दर 12.5% वरुन 13.5% करण्यात आला आहे. मात्र दरवाढ केल्यानंतरही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा स्टँडर्डकर कमीच आहे. इतर राज्यातील स्टँडर्ड कराचे दर - बिहार (15%), गुजरात (15%), आंध्र प्रदेश (14.5%), कर्नाटक (14.5%), तामिळनाडू (14.5%), पश्चिम बंगाल(14.5%), राजस्थान (14.5%) याप्रमाणे आहेत.

करमाफी असलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या कर आकारणीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यात शेतीस उपयुक्त अवजारे, दिव्यांगव्यक्‍तींसाठीची साधने, पुस्तके, जनावरे, कुक्कुट व मासे यांचे खाद्य, गहू, ज्वारी, तांदूळ व त्याचे पीठ, डायलिसीस व कॅन्सरवरील औषधे, दूध, भाजीपाला,फळे, फुले, जैविक खते, सर्व प्रकारचे सीडस्, साखर, मिरची, हळद, नारळ, सोलापुरी चादर व टॉवेल, मनुके व बेदाणे व अगरबत्ती यांचा समावेश आहे.

स्टँडर्ड कराची आकारणी 12.5% वरुन 13.5% इतकी होणाऱ्या महत्वाच्या वस्तूंमध्ये दुचाकी व मोटार वाहने, वाहनांचे सुटे भाग, पेट्रोलियम वस्तू जसे वंगण, ऑईल, इ., इलेक्ट्रॉनिक वापरण्याच्या वस्तू जसे टी.व्ही, फ्रिज, इ., फर्निचर वस्तू, इलेक्ट्रीकल वस्तू, शोभेच्या वस्तू यांचा समावेश आहे.

मुल्यवर्धित करांतर्गत 5.5% कराची आकारणी होणाऱ्या वस्तूंवर आता 6% कर आकारणी होणार आहे. त्यातील महत्त्वाच्या वस्तूंमध्ये विटा, बांबू,सायकल, नॉन फेरस मेटल, पेपर, होजियरी वस्तू, मसाले, मिठाई व फरसाण, प्रक्रिया केलेली फळे व भाज्या, इ., औषधे, खेळाचे साहित्य, तंत्रज्ञान वस्तू, दूधाची भुकटी, छत्र्या, लिखाणाचे साहित्य यांचा समावेश आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS