निर्माल्यापासून २१ ठिकाणी खत निर्मिती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

निर्माल्यापासून २१ ठिकाणी खत निर्मिती

Share This
मुंबई - गणपतीला मुंबईकर मोठ्या श्रध्देने दुर्वा,फुले, पत्री अर्पण करित असतात. याच अर्पण केलेल्या दुर्वा, फुलांच्या निर्माल्याचा सदुपयोग व्हावा याकरिता महापालिकेने २१ ठिकाणी निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यासाठी सेंद्रीय खत / गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प सुरु केले आहेत. 

गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुदर्शी पर्यंतच्या ११ दिवसांच्या कालावधीत महापालिका क्षेत्रात १ हजार ८३ मेट्रीक टन एवढे निर्माल्य जमा करण्यात आले आहे. या जमा झालेल्या निर्माल्यापासून महापालिका सेंद्रीय खत / गांडूळ खत तयार करणार आहे. याप्रकारे तयार झालेले सेंद्रीय खत / गांडूळ खत हे भविष्यात प्राधान्याने महापालिकेच्याच उद्यानांमध्ये वापरण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली आहे.

तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशीची गरज लक्षात घेऊन घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे दि. १५ व १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री साधारणपणे ३ वाजेपासून शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत विशेष स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमे अंतर्गत साधारणपणे ९ तासांच्या कालावधी दरम्यान मुंबईतील सर्व गणेशमुर्ती विसर्जन स्थळे व संबंधित रस्ते यांची साफसफाई व स्वच्छता महापालिकेद्वारे सुयोग्यप्रकारे करण्यात आली, अशीही माहिती उपायुक्त बालमवार यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व २४ विभागांमध्ये गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान सुमारे ६८५ टन निर्माल्य महापालिकेकडे जमा झाले होते. यावर्षी हे प्रमाण वाढून १ हजार ८३ मेट्रीक टन पर्यंत पोहचले आहे. यावर्षी निर्माल्य जमा करण्यासाठी महापालिकेने २४६ ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले होते.तसेच यासाठी महापालिकेचे ८९९ कामगार देखील कार्यरत होते.

महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये सर्वाधिक म्हणजे ११४ मेट्रीक टन एवढे निर्माल्य हे बोरिवली पश्चिम परिसरासह जवळपासच्या परिसराच्या नागरी सेवा सुविधाविषयक बाबींची जबाबदारी असणा-या 'आर मध्य' विभाग परिसरातून जमा करण्यात आले. तर या खालोखाल 'पी उत्तर' या विभागातून म्हणजेच मालाड, दिंडोशी आदी परिसरातून ७८.४ मेट्रीक टन एवढे निर्माल्य जमा करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages