महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सुविधा लोकांसाठी खुल्या कराव्यात - राजकुमार बडोले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सुविधा लोकांसाठी खुल्या कराव्यात - राजकुमार बडोले

Share This
मुंबई, : महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामधील तरण तलाव, उद्‌वाहन यांची तातडीने दुरुस्ती करावी तसेच येथील सोयीसुविधांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ व्हावा, यासाठी त्याचे दर कमी करावे. तसेच महाड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित ठिकाणांचे बुद्धिस्ट सर्किट तयार करून ते विकसित करावे, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी ( दि. 31 Aug)दिल्या आहेत.
महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारकासंदर्भात विधीमंडळात उपस्थित लक्षवेधीच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बडोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी बडोले बोलत होते. यावेळी आमदार भाई गिरकर, सुरजितसिंह ठाकूर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्रकुमार बागडे, समाजकल्याण आयुक्त पियूष सिंह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक राजेश ढाबरे, रायगड समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त प्रसाद खैरनार आदी यावेळी उपस्थित होते.

महाडच्या जवळपास मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे वणन हे गाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबडवे, दापोलीमधील डॉ. आंबेडकर यांचे घर, महाडच्या जवळील बौद्ध लेणी आणि हे स्मारक यांचे बुद्धिस्ट सर्किट तयार करून त्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासंदर्भात विचार करावा, असेही सामाजिक न्याय मंत्री बडोले यांनी यावेळी सांगितले.

बडोले म्हणाले की, महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक मोठे आहे. या स्मारकाला मोठ्या प्रमाणात लोकांनी भेट द्यावी, येथील सोयीसुविधांचा लाभ महाडमधील नागरिकांना व्हावा, यासाठी बार्टीने उपाययोजना कराव्यात. स्मारकामधील ग्रंथालयात सुमारे दहा हजार पुस्तके आहेत. या पुस्तकांचा लाभ स्थानिक युवकांना व्हावा, स्मारकांच्या ठिकाणी असलेल्या विविध सभागृहाचा उपयोग युवकांच्या कौशल्य विकासासाठी करण्यात यावा.

स्मारकाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक यावेत, यासाठी संग्रहालयाचे आधुनिकीकरण करून त्यात लाईट अँड साऊंड शो करावा. तसेच या ठिकाणी वर्षभर सुरू राहतील, असे कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही बडोले यांनी यावेळी दिल्या. यावेळी आमदार गिरकर आणि ठाकूर यांनी स्मारकाच्या उपयोगाबद्दल सूचना केल्या. बार्टीचे महासंचालक ढाबरे यांनी स्मारकामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages