मुंबई – सांताक्रुझ येथील विमानतळाला लागून असलेल्या झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन करण्याच्या नावाखाली जीव्हीके आणि उपजिल्हाधिकार्यांनी या परिसरातील हजारो गोरगरीब झोपडीवासीयांना बेघर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जीव्हीके आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ प्राधिकरण झोपडपट्टी पुनर्वसन कृती समितीच्या वतीने येत्या १७ सप्टेंबर रोजी जीव्हीके तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयावर झोपडीवासीयांचा प्रचंड असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
विमानतळ परिसरातील झोपडीवासीयांचे पुनर्वसन करण्याच्या नावाखाली जीव्हीके आणि उपजिल्हाधिकार्यांमार्फत या परिसरात सर्व्हे करण्यास सुरुवात करण्यात आली परंतु या सर्व्हेला येथील झोपडीधारक तसेच कृती समितीने जोरदार विरोध केला आहे. या भागातील झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासंबंधी सरकारने शासन निर्णय (जीआर) काढल्याचे जीव्हीके आणि उपजिल्हाधिकार्यांचे म्हणणे आहे, परंतु हा जीआर दाखविण्यास यापैकी कुणीही तयार नाही. पुनर्वसन करायचे असल्यास हा जीआर दाखविण्यात यावा तसेच झोपडीवासीयांसाठी बांधण्यात आलेली घरे दाखवा व त्यानंतर सर्व्हेचे काम सुरू करा अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
जीव्हीके आणि उपजिल्हाधिकार्यांनी सर्व्हेचा घोळ घालून संभ्रमित केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून येथील झोपडीधारकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही या मोर्चाच्या रूपाने करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या १७ सप्टेेंबर रोजी संभाजीनगर, आंबेवाडी येथून निघणारा हा मोर्चा आंबेडकरनगर, सम्राट अशोकनगर, वाल्मीकी नगर ते सहारा हॉटेल या मार्गाने जीव्हीके कार्यालयावर नेण्यात येणार आहे.
