कपिल शर्मा, इरफान खानसह १६ फ्लॅटधारकांनी पार्किंगची जागा गिळल्याने गुन्हे दाखल होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कपिल शर्मा, इरफान खानसह १६ फ्लॅटधारकांनी पार्किंगची जागा गिळल्याने गुन्हे दाखल होणार

Share This
मुंबई – एकीकडे अनधिकृत बांधकाम केल्याचे लपवून ठेवत मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचे ट्विट करून मुख्यमंत्री आणि पालिकेला कामाला लावणाऱ्या कॉमेडीयन कपिल शर्मा याने आणखी एक अनधिकृत बांधकाम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंधेरी पाठोपाठ गोरेगाव येथील इमारतीतील पार्किंगची जागाही शर्मा याने गिळली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकट्या कपिलनेच नव्हे तर अभिनेता इरफान खानसह या इमारतीतील १६ फ्लॅटधारकांनी पार्किंग गिळल्याने त्यांना महापालिकेने नोटीस बजावली असून गणेशोत्सवानंतर या १६ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
गोरेगाव येथे डीएलएच एन्क्लेव्ह या इमारतीत कपिल शर्मा आणि इरफान खान राहतात. या इमारतीत प्रत्येक मजल्यावर फ्लॅटधारकांसाठी पार्किंगची व्यवस्था देण्यात आलेली आहे. मात्र कपिल शर्मा आणि इरफान खानसह या इमारतीतील १६ फ्लॅटधारकांनी या पार्किंगचा वापर निवासी म्हणून केला आहे. या सर्व फ्लॅटधारकांनी इमारतीत अंतर्गत बदल केल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या अशी माहिती पी-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. एस. दोंदे यांनी दिली.
या इमारतीतील फ्लॅट क्रमांक ४, ५, ९, १२ आणि १६ विकण्यात आले आहेत. त्यात कपिल शर्माचा फ्लॅट क्रमांक ९ आणि इरफानचा ५ क्रमांकाचा फ्लॅट आहे. या सर्व फ्लॅटधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच बाकी फ्लॅट विकण्यात आलेले नसले तरी त्यातही अंतर्गत बदल करून पार्किंगची जागा हडप करण्यात आल्याने डीएलएच बिल्डरला नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेच्या पी-दक्षिण विभागाने आधी एप्रिल आणि नंतर पुन्हा जूनमध्ये त्यांना महापालिका अधिनियम ३५१ नुसार नोटिसा पाठवल्या होत्या. तसेच या इमारतींविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आलेले आहे. पोलिसांनी पंचनामा करून या १६ फ्लॅटधारकांविरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर या इमारतीतील अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार असल्याचे दोंदे म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages