ओबीसी आरक्षणाच्या विभाजनाची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ओबीसी आरक्षणाच्या विभाजनाची मागणी

Share This
मुंबई / प्रतिनिधी - इतर मागासवर्गीय गटास (ओबीसी) दिलेल्या २७ टक्के आरक्षणात विभागणी करण्यात यावी या मागणीसाठी भटक्या विमुक्तांनी बुधवारी आझाद मैदानावर मोर्चा काढला तसेच मुक्त दिनही साजरा केला. केंद्रीय ओबीसी आरक्षणाचा लाभ केवळ या गटातील वरच्या जातींनाच होत आहे, म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने या गटाच्या आरक्षणाची तीन गटात विभागणी करण्याची शिफारस केली होती. त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी बंजारा समाजाचे नेते आणि आमदार हरीभाऊ राठोड यांनी केली.
एकुण २७ ट्के आरक्षणाची भटके विमुक्त, बारा बलुतेदार आणि अतिमागास अशा तीन गटांना प्रत्येकी ९ टक्के आरक्षणाचा वाटा द्यावा, अशी यावेळी मागणी करण्यात आली. भटक्या विमुक्त आणि बारा बलुतेदार यांना क्रीमीलेअरच्या अटीतून वगळा, बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करा, या समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे स्थापना करा, गुरव समाजाच्या जमिनीचे प्रश्न सोडवा आणि बंजारा समाजाच्या पोहरादेवी देवस्थानाचा विकास करा अशा मागण्याही करण्यात आल्या.
मोर्चास बारा बलुतेदार महासंघाचे कल्याणराव दळे, किसन राठोड, डॉ. संजय निषाद, अशोक राजभर आदी नेते उपस्थित होते. पारंपरिक पेहराव परिधान करुन आलेल्या बंजारा समाजाच्या महिलांमुळे आझाद मैदान रंगीबेरंगी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages