साथीचे आजार आणि महापालिका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

साथीचे आजार आणि महापालिका

Share This
मुंबई शहराची ओळख देशाची आर्थिक राजधानी म्हणून असली तरी आर्थिक राजधानी प्रमाणे नागरिकांना ज्या सेवा सुविधा द्यायला हव्यात त्यात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मुंबई महानगरपालिका कमी पडत आली आहे. दरवर्षी महापालिकेचे बजेट फुगत असले तरी बजेट मधील २३ ते ३० टक्के रक्कमच प्रशासनाला खर्च येत आहे. यावरून नागरिकांना किती चांगल्या सोयी सुविधा महापालिका देते याची प्रचिती येते. चांगले रस्ते, पाणी, आरोग्य, कचरामुक्त शहर देण्यात प्रशासन कमी पडत आले आहे.

देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या आणि जगातील महागड्या मुंबई शहरामध्ये सर्वच सोयी सुविधा मिळत असतील असेही नाही. महानगरपालिका दरवर्षी नागरिकांच्या खिशातून कर रूपाने पैसे वसूल करत आहे. मुंबई महानगरपालिकेचा 37 हजार 500 कोटीचा अर्थसंकल्प यावर्षी जाहिर करण्यात आला. यापैकी आरोग्य, वैद्यकीय विभागासाठी 3693 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण बजेट पैकी जवळपास १० टक्के रक्कम आरोग्यासाठी राखीव ठेवली असली तरी मुंबईत वेगवेगळ्या आजारांनी आणि रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांमुळे नागरिक त्रस्त आहेत.

मुंबईमध्ये गेल्या कित्तेक वर्षात विविध आजारांनी डोके वर काढले आहे. मलेरिया, डेंग्यू, लेप्टोपायरेसिस सारखे अनेक आजार लोकांना झाले आहेत. परंतू एखाद्या सेलिब्रिटीला कोणताही आजार झाल्यास पालिका खडबडून जागी होताना दिसत आहे. यश चोप्रा यांना डेंग्यू झाल्यानंतर सेलिब्रिटींच्या घराची व परिसराची पाहणी केल्यावर अनेकांच्या घरी व घराच्या आसपास डेंग्यूच्या अळ्या मिळाल्या होत्या. यावर्षी आता पुन्हा विद्या बालन या अभिनेत्रीला डेंग्यू झाल्याचे निदर्शनास आल्यावर पालिकेने ती राहत असलेल्या इमारती मध्ये पाहणी केली असता अभिनेता शाहिद कपूर याच्या व आणखी एका महिलेच्या घरात डेंग्यूच्या अळ्या मिळाल्या आहेत. पालिका आता शाहिद कपूरवर नियमानुसार कारवाई करणार आहे.

याच दरम्यान पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाने एक आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार झोपडपट्टींपेक्षा इमारतींच्या परिसरात डेंग्यू पसरविणा-या डासांची उत्पत्तीस्थाने चार पटीने अधिक आहेत. जानेवारी ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत ७४ लाख ७८ हजार ५५६ घरांची मलेरिया, डेंग्यूच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान ८० लाख २० हजार कंटेनर्स देखील तपासण्यात आले. या तपासणी दरम्याने ८ हजार ९४६ ठिकाणी एडिस डासांची उत्पतीस्थाने आढळून आली. या ८ हजार ९४६ उत्पत्तीस्थानांपैकी १,८२८ ठिकाणे ही झोपडपट्टी परिसरातील आहेत. तर ७,११८ ठिकाणे ही इमारती / सोसायटी यांच्या परिसरातील आहेत.

याबाबत महापालिकेद्वारे १३,५९३ नोटीस देण्यात आल्या. तर ९२७ प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. याच आठ महिन्यांच्या कालावधी दरम्यान २६ लाख ९२ हजार रुपये एवढा दंड कायदेशीर प्रक्रियेनुसार वसूल केला आहे. नागरिकांकडून दंड वसूल करताना पालिकेने नागरिकांच्या खिशातून कर रूपाने वसूल केलेल्या पैशातून जवळपास ३७ लाख रुपये जनजागृतीच्या जाहिरातीसाठी खर्च केले आहेत. परंतू मुंबईमध्ये साथीच्या रोगांची जी आकडेवारी आहे ती पाहता हे पैसे फुकट गेल्याचे दिसत आहे.

मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे १०१०, लेप्टोचे ५३, डेंग्यूचे १०६ पेशंट होते, डेंग्यूचे संशयित म्हणून १६७० तर लेप्टोच्या ४२८ रुग्णांची नोंद आहे. सप्टेंबरच्या ११ तारखेपर्यंत मलेरियाचे ३१५, लेप्टोचे ९, डेंग्यूचे १२२ रुग्ण असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. लेप्टोने मागील वर्षी जानेवारी ते ऑगस्ट महिन्यात १८ तर यावर्षी अद्याप ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर डेंग्यूमुळे यावर्षी अद्याप २ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ३ वर्षाची आकडेवारी पाहता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात मलेरिया डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

सप्टेंबर आता सुरु झाला असून ऑक्टोबर महिना येऊ घातला आहे. या दोन महिन्यात मलेरिया डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पालिकेने लोकांच्या निदर्शनास न येणाऱ्या जाहिरातीवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा मुंबईमधून हे रोग कायमचे हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पालिकेने आकडेवारी जाहीर करून आम्ही किती घरांची पाहणी केली, किती लोकांवर कारवाई केली जाहीर केले असले तरी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी धूम्रफवारणी केलीच जात नाही, धूम्रफवारणी करणारे कर्मचारी गेल्या कित्तेक महिन्यात आल्याचे लोकांनी पाहिलेले नाही. साचलेल्या पाण्यात औषधें टाकली जातात, असे कर्मचारीही कुठे औषध टाकताना दिसत नाहीत, याची दखल पालिकेने घेणे गरजेचे आहे.

विद्या बालन या अभिनेत्रीला डेंग्यू झाल्यानंतर ती राहत असलेल्या इमारतीमध्ये पोलीस घेऊन पालिकेला डेंग्यूच्या आळ्यांची तपासणी करावी लागली होती. यामध्ये शाहिद कपूर व एका महिलेच्या घरी आळ्या मिळाल्या. अशी परिस्थिती असताना पालिकेने या सेलिब्रेटींचे आभार मानले आहेत. मग यावर्षी ७४ लाख ७८ हजार ५५६ घरांची मलेरिया, डेंग्यूच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान सगळीकडेच डेंग्यू मलेरियाच्या आळ्या मिळाल्या असे नाही, तरीही नागरिकांनी पालिकेला सहकार्य केले. त्यांचे आभार मानायला मात्र पालिकेला विसर पडलेला दिसत आहे. हे तेच आहेत जे सेलिब्रेटी प्रमाणे पालिकेला कर भरत आहेत, निदान याची तरी पालिकेने जाण ठेवावी.

अजेयकुमार जाधव (मो. ९९६९१९१३६३)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages