सहा महिन्यात १ लाख १२ हजार फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सहा महिन्यात १ लाख १२ हजार फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

Share This
३० कोटी रुपये किमतीचा माल जप्त, रु. २ कोटी ३ लाखांचा दंड वसूल
मुंबई / प्रतिनिधी - महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या विरोधात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याद्वारे धडक कारवाई केली जात आहे. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१६ या सहा महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण महापालिका क्षेत्रात १ लाख १२ हजार ६५१ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईद्वारे सुमारे ३० कोटी ५९ लाख ३३ हजार ५०१ रुपये एवढ्या विमोचन आकाराचा माल जप्त करण्यात आला. तर या सहा महिन्यांच्या कालावधी दरम्यान महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या कारवाईपोटी रुपये २ कोटी ३ लाख ५५ हजार ३४४ एवढा दंड महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे, अशी माहिती उपायुक्त(अतिक्रमण निर्मूलन) मिलिन सावंत यांनी दिली आहे.

एप्रिल ते सप्टेंबर २०१६ या ६ महिन्यांच्या कालावधीत महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे रस्त्यांवर / पदपथांवर व्यवसाय करणा-या फेरीवाल्यांवर नियमितपणे कारवाई करण्यात आली. ही कारवाई सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही सत्रांमध्ये करण्यात आली आहे. यानुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये १ लाख १२ हजार ६५१ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान ५ हजार १६० हातगाड्या, १०४४ सिलिंडर्स, ५७ टेबल स्टॉल्स व २४ उसाचे चरक देखील जप्त करण्यात आले. त्याचबरोबर ३५ हजार ९२८ नाशवंत पदार्थ विक्रेते, ५० हजार ३६६ अनाशवंत पदार्थ विक्रेते,२० हजार ७२ अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

एप्रिल ते सप्टेंबर २०१६ या ६ महिन्यांच्या कालावधी दरम्यान 'जी उत्तर'विभागात सर्वाधिक म्हणजे १३ हजार १७३ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. त्याखालोखाल 'ए' विभागात ८ हजार ५६, तर 'आर मध्य'विभागात ६ हजार २४८ एवढ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर सर्वाधिक दंड वसूली ही 'एच पश्चिम' विभागातून रुपये २६ लाख १९ हजार ५७७ एवढी करण्यात आली, तर त्याखालोखाल 'एल'विभागातून रुपये १२ लाख ६३ हजार ५७४, 'आर दक्षिण' विभागातून रुपये १० लाख ५० हजार ४६९, तर 'आर मध्य' विभागातून रुपये १० लाख २१ हजार ७६७ एवढी रक्कम वसूल करण्यात आली. या रकमेत लिलावातून प्राप्त रकमेचाही समावेश आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages