भाजपाकडून दिव्यांग व्यक्तींचा अपमान - मोफत बसपास वितरणावेळी बेस्ट अध्यक्ष गैरहजर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 October 2016

भाजपाकडून दिव्यांग व्यक्तींचा अपमान - मोफत बसपास वितरणावेळी बेस्ट अध्यक्ष गैरहजर

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पालिकेतील सत्ताधारी शिवसेना- भाजपातील दरी वाढत चालली आहे. आज महापौर बंगल्यावर मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना बेस्ट प्रवासाचे मोफत बसपास वाटपाच्यावेळी बेस्टचे अध्यक्ष असलेले मोहन मिटबावकर यांनी उपस्थित राहण्याचे टाळत यापुढे शिवसेनेबरोबर एका व्यासपीठावर भाजपाचे नेते बसणार नसल्यचे स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या योजनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दिव्यांगांना बेस्टमधून मोफत प्रवासाची सुविधा करण्याचे आदेश मुंबई महानगपालिकेला आले होते. त्याच बरोबर महापौर स्नेहल आंबेकर आणि सभागृह नेत्या तृष्ण विश्वासराव याही यासाठी फारच आग्रही होत्या. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे आणि सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी मोफत पास देण्याबाबतचे धोरण ठरवत दिव्यांगांना बसचे मोफत पास देण्याचा निर्णय अमलात आणला. केंद्रात भाजपाचे सरकार आहे आणि बेस्टच्या अध्यक्षपदीही भाजपाचे नगरसेवक मोहन मिठबावकर असताना आज सदर कार्यक्रमाला मिठबावकर हे महापौर बंगल्यावर आले होते मात्र भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांच्या दुरध्वनीनंतर कार्यक्रमाला उपस्थित न राहता परत माघारी फिरले. यामुळे दिव्यांगांचा अपमान झाल्याची भावना पासधारकांमध्ये व्यक्त झाली. 

या मोफत बसपास समारंभात दिव्यांग व्यक्तींना मोफत बसपास देऊन सामाजिक दायित्व जपले आहे. या पुढेही त्यांना आवश्यक व अध्यावत सेवा-सुविधा पुरविण्याकरीता पालिका प्रयत्नशील राहील असं महापौरांनी सांगितले. तर सभागृह नेत्या तृष्ण विश्वासराव यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी स्मार्ट कार्डचे ४० रुपये शुल्क देखील पालिकेने भरण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात येईल असे सांगितले. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी ही दिव्यांगांसाठी पालिकेची दिवाळी भेट असल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी ही योजना कायम राबविण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यास प्रशासन दक्ष राहील तसेच त्यांच्या इतर मागण्यांसाठीही विचारविनिमय करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी एकूण ३७ दिव्यांग व्यक्तींना मोफत सवलतीचे स्मार्ट ओळखपत्र वितरित करण्यात आले. या वेळी अपंग सहाय्य सेनेचे सूर्यकांत लाडे, अपंग संचालित टेलेफोन बुध संघटनेचे माळणकर, महारष्ट्र अपंग संघटनेचे पाटील इत्यादींचे सहकार्य लाभले.

सोमवारपासून दिव्यांग व्यक्तींना बसपास मिळणार मुंबईतील दिव्यांग व्यक्तींकरीता मोफत बसपासाची सवलत सोमवार दिनांक २४ ऑक्टोबर १६ पासून लागू होणार आहे. ही प्रक्रिया मुंबईतील २७ बेस्ट डेपोमध्ये सुरु करण्यात येणार असून या साठी दिव्यांगांना एक अर्ज देण्यात येणार आहे. हा अर्ज भरून सोबत पासपोर्ट साईज दोन फोटो आधारकार्ड व दिव्यांग दाखल्याची छायांकित प्रत सोबत जोडायचा आहेत. ही सवलत ४० टक्के व त्यापेक्षा अधिक टक्केवारी असणाऱ्या दिव्यांगांनाच मिळणार असून याचा लाभ घ्यावा असे आव्हान शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे व सचिव सुभाष कदम यांनी केले आहे.

Post Bottom Ad