सागरी किनारा रस्त्याच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या भू-तांत्रिक सर्वेक्षणास प्रारंभ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2016

सागरी किनारा रस्त्याच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या भू-तांत्रिक सर्वेक्षणास प्रारंभ

९.९८ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्यासाठी १६६ कूपछिद्रांद्वारे केले जाणार सर्वेक्षण
३१ जानेवारी २०१७ पर्यंत सर्वेक्षण पूर्ण होणे अपेक्षित
मुंबई / प्रतिनिधी 21 Oct 2016 - बृहन्मुंबई महापालिकेसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या आणि मुंबईकर नागरिकांसाठी बहु-उपयोगी ठरणा-या प्रस्तावित सागरी किनारा रस्त्याच्या (कोस्टल रोड) भू-तांत्रिक सर्वेक्षणास (Geo-technical Investigation) आज सुरवात झाली आहे. या सर्वेक्षणाच्या कामाची महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज पाहणी केली. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, उपायुक्त (अभियांत्रिकी) राजीव कुकनूर व प्रमुख अभियंता (सागरी किनारा रस्ता) मोहन माचिवाल यांच्यासह महापालिकेचे संबधित अधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित सागरी किनारा रस्त्याच्या पहिल्या टप्प्याच्या भू-तांत्रिक सर्वेक्षणाच्या कामांतर्गत शामलदास गांधी मार्गाच्या (प्रीन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूलापासून वरळी-वांद्रे सागरी सेतू पर्यंतच्या ९.९८ किमी लांबीच्या प्रस्तावित रस्त्यावर ३० ते ४० मीटर खोलीची १६६ कूपछिद्र (Bore-holes) घेण्यात येणार आहेत. या छिद्रांच्या आधारे प्रस्तावित सागरी रस्त्यासाठी आवश्यक असणारे भू-तांत्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण साधारणपणे पुढील तीन महिन्यात म्हणजेच ३१ जानेवारी २०१६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, अशी माहिती उपायुक्त (अभियांत्रिकी) राजीव कुकनूर यांनी दिली आहे.

प्रस्तावित सागरी किनारा रस्त्याच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या भू-तांत्रिक सर्वेक्षणासाठी आवश्यक असणा-या विविध परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये उच्च स्तरीय समिती, महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (MCZMA), भारतीय नौदल (India Navy), भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard), महाराष्ट्र सागरी मंडळ (Mumbai Maritime Board) आदींद्वारे देण्यात आलेल्या परवानग्यांचा समावेश आहे, अशीही माहिती कुकनूर यांनी दिली आहे.

Post Bottom Ad