कुपोषण निर्मुलनासाठी पाच मंत्री आणि सचिवांचा समावेश असलेले टास्क फोर्स स्थापन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुपोषण निर्मुलनासाठी पाच मंत्री आणि सचिवांचा समावेश असलेले टास्क फोर्स स्थापन

Share This
मुंबई, दि.24 : बालविकासासाठी असलेल्या विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून कुपोषणावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने टास्क फोर्स स्थापन केले आहे. राज्याची न्युट्रीशन पॉलीसी देखील तयार करण्यात येत आहे. एकीकडे पालघर जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण आढळून येत असतानाच दुसरीकडे माता मृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यात महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर असल्याचे राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज येथे सांगितले.

युनिसेफतर्फे हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित करण्यात आलेल्या हवामानातील बदल, वाढते नागरीकरण याविषयावरील तीन दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन मुख्य सचिवांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. युनिसेफचे जीन गॉफ, लुईस जॉर्ज, कॅरीन हलशॉफ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आज साजरा होत असलेल्या संयुक्त राष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्य सचिव यावेळी म्हणाले की, आपत्ती कुठलीही असो आपल्याला धडा शिकवून जाते. महाराष्ट्रात सातत्याने तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती होती. या नैसर्गीक आपत्तीतून राज्यात जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला. लोकांनी श्रमदान करून त्यात सक्रिय सहभाग नोंदविला. यावर्षी पावसाने साथ दिल्याने नदी, नाले, तलाव,विहीरी पाण्याने भरून गेली आहेत. लोकांनी श्रमदानासोबतच साहित्य स्वरुपातही योगदान दिले. खासगी उद्योग संस्थांनी देखील सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या योजनांना पाठबळ दिले. दुष्काळाचे सावट दूर होऊन पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे.

पावसाने साथ दिल्याने रब्बी हंगामातील पीकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होईल अशी अपेक्षा आहे. काही भागात पाऊस जास्त झाल्याने पीकांचे नुकसान झाले आहे. मराठवाडा विभागातील 78 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी पीक विमा योजनेंतर्गत सहभागी झाले असून त्यांना पिकाच्या नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ यांच्या सहकार्यातून विविध क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून महत्वपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहेत, असे सांगून मुख्य सचिव पुढे म्हणाले की, राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याची राज्यव्यापी मोहिम होती घेण्यात आली. ह्या मोहिमेतही मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग मिळाला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages