मुंबई, दि. 24 : किमान वेतन अधिनियमांतर्गत कामगारांचे किमान वेतन न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.
याबाबत कामगार मंत्री पाटील-निलंगेकर यांनी सांगितले की, कामगार विभागामार्फत यापूर्वीच संबंधित महानगरपालिकांना सूचना ईमेल द्वारे देण्यात आल्या असून संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत आज संध्याकाळपर्यंत त्वरित कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मुंबई, नाशिक आणि ठाणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 8 हजार इतकी आहे. तिन्ही महानगरपालिकांनी आपापल्या सफाई कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन दयावे अन्यथा त्या महानगरपालिकेवर कडक कारवाई केली जाईल अशी भूमिका कामगार मंत्री पाटील-निलंगेकर यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान नाशिक महानगर पालिकेने कामगारांचे वेतन आणि थकबाकी उदयापर्यंत देण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
दोन महिन्यापूर्वी कामगार संघटनेबरोबर झालेल्या समन्वय बैठकीत कामगारांना किमान वेतन मिळेल तसेच या कामगारांना दिवाळीपूर्वी 20 महिन्यांची थकबाकी मिळेल अशी भूमिका कामगार मंत्री महोदयांनी मांडली होती. त्याचवेळी या तिन्ही महानगरपालिकांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र याबाबत अदयापही या तिन्ही महानगरपालिकांनी कार्यवाही पूर्ण केलेली दिसून येत नाही. तसेच किमान वेतन अधिनियमाअंतर्गत संबंधित कंपनी किंवा महानगरपालिकेकडून 10 पटीने थकीत वेतन वसूल करण्याचीही तरतूद आहे. सदर तीन्ही महानगरपालिकांनी थकीत वेतन देण्याबाबतची कार्यवाही त्वरीत पूर्ण करावी अन्यथा या महानगरपालिकांना दोषी धरुन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असेही कामगार मंत्री पाटील-निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे.