महात्मा गांधी मार्गावरील महापालिका चौक्यांचे आधुनिकीकरण
मुंबई / प्रतिनिधी - जागतिक वारसा स्थळ असणारे छत्रपति शिवाजी टर्मिनस आणि त्याच्या लगतच्या परिसरात अनेक पर्यटक छायाचित्रे काढत असतात. हे जागतिक वारसा स्थळ व लगतचा परिसर डोळे भरुन पाहण्यासाठी किंवा येथे छायाचित्रे काढण्यासाठी व्ह्युइंग गॅलरी नसल्याने अनेकदा पर्यटक वाहतूकीने गजबजलेल्या इथल्या रस्त्यावर येऊन छायाचित्रे काढत असतात. दक्षिण मुंबईतील वाहतूकीचा ओघ लक्षात घेता ही बाब पर्यटकांसाठी धोकादायक ठरु शकते. ही बाब लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या पूर्व बाजूला जोडणा-या भूमिगत पादचारी मार्गाच्या वर एक 'व्ह्युइंग गॅलरी' उभारण्याचा प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी 'ए' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना दिले.बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'ए' विभाग कार्यालयाच्या परिसरात दररोज मोठ्या संख्येने येणा-या पर्यटकांसह विविध कामांच्या निमित्ताने लाखो लोक देखील ये - जा करीत असतात. या परिसरात नागरिक व पर्यटकांचा असणारा ओघ लक्षात घेऊन या परिसरात अधिक चांगल्या नागरी सेवा सुविधा देता याव्यात, या दृष्टीने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार व 'ए' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या समवेत आज सकाळी विशेष दौरा केला. महापालिका आयुक्तांनी महात्मा गांधी मार्गावरील फॅशन स्ट्रीट परिसर, छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या आणि चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या जवळील परिसर व तेथील दोन्ही भूमिगत पादचारी मार्ग, भाटीया बाग, महापालिका मुख्यालयाजवळील परिसर आदी परिसरांना भेटी दिल्या. यावेळी मेहता यांनी दिघावकर यांना काही बाबतीत प्रशासकीय प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महात्मा गांधी मार्ग (फॅशन स्ट्रीट) कडून छत्रपति शिवाजी टर्मिनस परिसरात येण्यासाठी वा तिकडून जाण्यासाठी ज्या प्रकारे पादचारी मार्ग आहे; त्याचप्रकारचा पादचारी मार्ग छत्रपति शिवाजी टर्मिनस जवळील भाटीया बागेतून तयार करण्याचा प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. महात्मा गांधी मार्गावर फॅशन स्ट्रीट च्या समोरील पदपथाला लागून महापालिकेच्या विविध खात्यांच्या चौक्या आहेत. या सर्व चौक्यांची अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्बांधणी करावी; ही पुनर्बांधणी करताना शक्य तिथे काचेच्या भिंतींचा वापर करावा, जेणेकरुन पदपथांवरुन चालणा-यांना आजाद मैदान देखील दिसू शकेल असे नियोजन करण्यास सांगितले आहे.
चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ व इंडियन मर्चंट चेंबर च्या कार्यालयासमोर वीर नरिमन मार्गावर असणा-या सार्वजनिक शौचालयातील अस्वच्छतेबाबत महापालिका आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सदर बाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. या शौचालयाच्या बाजूला वीर नरिमन मार्गालगत सुयोग्यप्रकारे पदपथ तयार करण्याबाबत सुयोग्य कार्यवाही करण्याचे आदेश देखील आजच्या भेटीप्रसंगी महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.