
मुंबई / प्रतिनिधी - राणीबागेतील मृत पावलेल्या पेंग्विनच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल सोमवारी परळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथोलॉजी विभागाने पालिकेला सादर केला. यात पेंग्विनला विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे त्याचे रक्त दूषित झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राणीबागेतील पेंग्विनचा मृत्यू शिवसेनेच्या चांगलाच अंगलट आला आहे. या मृत्यूला युवराजांचा हट्टीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत अजून किती पेंग्विनचा जीव घेणार, असा सवाल विरोधकांनी केला आहे. यावर पालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांसह नगरसेवकांनी बोलणे टाळले. यावरून मंगळवारी पालिका सभागृहात चांगलाच राडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी पेंग्विनसाठी हट्ट धरल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने हा हट्ट पुरवण्यासाठी राणीबागेत पेंग्विन आणण्यास प्रशासनाला भाग पाडले. त्यामुळे दक्षिण कोरीयाच्या सेऊल येथून आठ पेंग्विन आणण्यात आले.हे पेंग्विन मुंबईच्या वातावरणात तग धरूच शकत नसल्याचे प्राणीमित्र संघटनांकडूनही सांगण्यात आले होते; पण त्याकडे सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाने दुर्लक्ष केले. अखेर एका पेंग्विन मादीचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे या मृत्यूचे खापर थेट शिवसेनेवर फोडण्यात आले.
मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र पाठवून ‘ये तो होना ही था’ असे सांगत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. थंड प्रदेशातील या पक्षांना आणून आपण त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे मनसेने या अगोदरच आरोप केला होता. तरीसुद्धा पेंग्विन आणून मुंबईकरांच्या 25 कोटी रुपयाचा चुराडा केला आहे. त्यामुळे अजून एका पेंग्विनच्या मृत्यूची वाट न बघता त्यांना परत पाठवण्यात यावे, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.
बालहट्टापोटी शिवसेनेने एका पक्षाची हत्या केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी केला. युवराजांची पेंग्विन बघण्याची इच्छा पूर्ण झाली असेल तर ते परत पाठवावे, अशी कोपरखळी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी मारली. मुंबईच्या वातावरणात पेंग्विन तग धरू शकेल की नाही याबाबत शंका असतानाही बालहट्टापायी महापालिकेने 25 कोटी खर्च करून पक्षी आणले, तसेच त्यांच्या निवार्यासाठी असे मिळून जवळपास 63 कोटी रुपये खर्च केले. याप्रकरणी महापालिका विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
पालिका जबाबदारपेंग्विन आणू नये यासाठी पेटा आग्रही होती. 6 ते 7 डीग्री वातावरणात पेंग्विन जगूच शकत नाहीत. याबाबत राष्ट्रीय प्राणी प्राधिकरणाला पत्रही लिहले होते. राणीबागेतील पक्षांच्या मृत्यूचे प्रमाण देशातील अन्य प्राणीसंग्रहालयाच्या तुलनेत जास्त आहे. 2010 ते 2012मध्ये 150 पक्षांचा मृत्यू तर 2012-13मध्ये 60 पक्षांचा मृत्यू झाला होता. राणीबागेत कायमस्वरूपी पशुवैद्यकीय डॉक्टर नाही. डिसेंबर 2015मध्ये राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने राणीबागेला भेट देऊन, येथील वातावरण पक्षी व प्राण्यांसाठी चांगले नसल्याची पालिकेला नोटीस बजावली होती. त्यामुळे या एका नोटीसवर राणीबागेचा परवाना रद्द होऊ शकतो. तशी मागणी पेटाचे पेटाचे निकुंज शर्मा यांनी केली असल्याचे सांगितले.