महापालिकेच्या 'एन' विभागाची धडक कारवाई
मुंबई / प्रतिनिधी
घाटकोपर पूर्व परिसरातील न्यू पंतनगर मध्ये 'वल्लभ बाग लेन' पासून रेल्वे पोलिस मैदानाकडे जाणा-या रस्त्याच्या मधोमध अनधिकृतपणे बांधण्यात आलेला चौथरा व शेडचे बांधकाम महापालिकेच्या 'एन' विभागाद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान नुकतेच तोडण्यात आले आहे.
मुंबई / प्रतिनिधी
घाटकोपर पूर्व परिसरातील न्यू पंतनगर मध्ये 'वल्लभ बाग लेन' पासून रेल्वे पोलिस मैदानाकडे जाणा-या रस्त्याच्या मधोमध अनधिकृतपणे बांधण्यात आलेला चौथरा व शेडचे बांधकाम महापालिकेच्या 'एन' विभागाद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान नुकतेच तोडण्यात आले आहे.
हे बांधकाम तोडण्याचे काम सुरु असतानाच परिसरातील रहिवाश्यांनी महापालिकेच्या कारवाईला तीव्र स्वरुपाचा विरोध केला. तथापि, पंतनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी - कर्मचारी यांनी तत्परतेने केलेल्या सहकार्यामुळे महापालिकेच्या 'एन' विभाग कार्यालयाच्या पथकास सदर तोडकाम योग्य प्रकारे पूर्ण करता आले. ही कारवाई महापालिकेच्या परिमंडळ ६ चे उपायुक्त नरेंद्र बर्डे यांच्या मार्गदर्शनात व एन विभागाच सहाय्यक आयुक्त सुधांशु मोहन द्वीवेदी यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या संबंधित विभागाच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे घाटकोपर पूर्व च्या पंतनगर मधील संबंधित रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
घाटकोपर पूर्व च्या न्यू पंतनगर मध्ये `वल्लभ बाग लेन' कडून रेल्वे पोलीस मैदानाकडे जाणा-या पंतनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यावर आणि इमारत क्रमांक १५१ च्या जवळ रस्त्याच्या मधोमध अनधिकृतपणे एक चौथरा बांधून त्यावर शेडचे बांधकाम करण्यात आले होते. साधारणपणे १० फूट रुंदी व १५ फूट लांबी याप्रमाणे सुमारे १५० चौरस फुटांचे असणारे हे बांधकाम रेल्वे पोलीस मैदानाच्या प्रस्तावित गेटसमोरच करण्यात आले होते. हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन यांनी अतिक्रमण निर्मूलनाशी संबंधित असणा-या ३० पोलिसांचा बंदोबस्त उपलब्ध करुन दिला होता. सदर अतिक्रमण निर्मूलन कारवाई बाबत विशेष आवश्यकता लक्षात घेऊन पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक हे अतिक्रमण निर्मूलन कारवाई प्रसंगी स्वत: उपस्थित होते. तसेच महापालिकेचे ४७ कामगार – कर्मचारी - अधिकारी ही कार्यवाही करण्यासाठी उपस्थित होते. या कारवाईसाठी १ जेसीबी, १ लॉरी व १ डंपर यांचाही वापर करण्यात आला.