
मनसे गटनेत्यांच्या विरोधात तक्रार
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ९२ सांताक्रूझ (प.) मनसेच्या नगरसेविका व महिला बालविकास समितीच्या सदस्या गीता चव्हाण यांनी आपल्या लेटरहेडवर खोट्या सह्या करून राजिनामा घेतला गेल्याची तक्रार आझाद मैदान पोलिस ठाण्यात केली असल्याची माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषद दिली.
नगरसेविका गीता बाळकृष्ण चव्हाण यांच्या लेटरहेड वर बनावट सही करून बालकल्याण समितीचा राजीनामा मुंबई महानगर पालिका चिटणीस यांच्याकडे सुपूर्द केला. हा राजिनामा मनसेचे गटनेते संदिप देशपांडे यांनी खोट्या सह्या करून पालिका चिटणिसांकडे सादर केल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. लेटरहेडवर खोट्या सह्या केल्या प्रकरणाची चौकशी करून दोषी लोकांवर कारवाई करावी अशी तक्रार आझाद मैदान पोलिस ठाण्यात केली असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
दरम्यान चव्हाण यांनी राजीनामा 29 ऑगस्टला अजेंडामधून वितरीत करण्यात आला होता. हा राजीनामा 30 ऑगस्टला महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. यानंतर महिला व बालविकास समितीची एक बैठकही झाली. या दरम्यान चव्हाण याना आपल्या राजिनाम्याबाबत माहिती पडले नाही का ? दोन महीने त्या जाग्या झाल्या आहेत. त्यांच्या आरोपात दम नसून हस्ताक्षर तज्ञाकडून याची चौकशी करावी अशी मागणी मनसेचे गटनेते संदिप देशपांडे यांनी केली आहे. नगरसेविका चव्हाण यांची पक्षाकडून चौकशी सुरु असून कारवाई सुरु असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.