उरी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना मदतीचे वाटप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उरी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना मदतीचे वाटप

Share This
मुंबई, दि. 20 : अतिशय खडतर परिस्थितीत सीमेवर देशाच्या सैन्यातील जवान हे देशाच्या व नागरिकांच्या रक्षणासाठी सतत कार्यरत असतात. अनेकवेळा हे जवान देशासाठी शहिद होत असतात. अशा वेळी आपण सगळे त्यांच्यामागे उभे आहेत ही भावना देशभर निर्माण व्हावी,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
जेम्स अँड ज्वेलरी नॅशनल रिलिफ फाऊंडेशन, मुंबई डायमंड मर्चंट असोसिएशन, भारत डायमंड बोर्स यांच्या वतीने उरी हल्ल्यातील शहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत देण्याचा कार्यक्रम बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील डायमंड सेंटर येथे झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुंबई महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त यूपीएस मदान, मुंबई डायमंड मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष भरत शहा, जेम्स अँड ज्वेलरी नॅशनल रिलिफ फाऊंडेशनचे संस्थापक अनुप मेहता,अध्यक्ष प्रणवशंकर पंड्या, उपाध्यक्ष मेहूल शहा, केतन पारेख, रसेल मेहता आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाच्या संकटकाळात हिरे उद्योजकांकडून अनेक तऱ्हेची मदत झाली आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व अनोखे असून या माध्यमातून या उद्योजकांनी संवेदनशीलता दाखविली आहे. देशाच्या सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या शहिद जवानांच्या परिवारांमध्ये देशातील सव्वाशे कोटी जनता सामिल आहे, ही भावना त्यांच्या कुटुंबांमध्ये रुजविणे आवश्यक आहे. जवानांचे बलिदान वाया जाणार नाही.

उरी हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट पसरली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेची भूमिका घेतली. मात्र, कोणी आपल्या देशावर हल्ला केला तर त्याला त्याच प्रकारे प्रत्युत्तर देण्याची तयारीही केली. त्यानंतर आपल्या सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करून आपली कोणतीही हानी न होता हल्ला यशस्वी केला. शत्रूच्या भागात घुसून कारवाई करण्याची क्षमता भारतीय सैन्याकडे आहे, परंतु त्यांना पाठबळ देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यामुळे आपल्या सैन्याचे अतुलनीय कामगिरी संपूर्ण जगभर गेली आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर नव्या अध्यायाला सुरूवात झाली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेसाठी कडक उपाय योजना केल्या आहेत. मुंबईत सहा हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. तसेच पोलीस आयुक्त कार्यालयात डेटा व सर्व्हिलन्स सेंटर उभारण्यात आले आहेत. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी ऑटोमॅटिक नंबरप्लेट रीड कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्या माध्यमातून आतापर्यंत पंधरा हजार जणांना ई चलानद्वारे नोटिसा देण्यात आल्या आहेत. डायमंड सेंटरमध्येही सिक्युरिटी डेटा सेंटर उभारल्यामुळे सुरक्षा व्यवस्था मजबूत झाली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages