खड्ड्यांप्रकरणी आयुक्तां विरोधात अविश्वास ठराव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खड्ड्यांप्रकरणी आयुक्तां विरोधात अविश्वास ठराव

Share This
मुंबई - महापालिकेतील भ्रष्टाचारासाठी शिवसेनेलाच जबाबदार धरण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू असताना त्यांच्या मर्जीतील मानले जाणाऱ्या आयुक्तांना मंत्रालयात परत पाठवण्याची तयारी सत्ताधारी शिवसेना व विरोधी पक्षांनी केली आहे. विरोधी पक्षांनी खड्ड्यांप्रकरणी आयुक्त अजोय मेहता यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणल्यास त्याला पाठिंबा देण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे. 
खड्ड्यांवरून राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मुंबई खड्ड्यात असताना केवळ ३०-३५ खड्डे असल्याचा दावा प्रशासन करीत असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत आज तीव्र पडसाद उमटले. आयुक्तांनी स्वत: रस्त्यावर उतरून खड्ड्यांची खरी आकडेवारी सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले होते. मात्र याबाबत स्थायी समितीपुढे सादर केलेल्या अहवालात खड्ड्यांचा उल्लेख नव्हता. त्यामुळे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी बैठक तहकूब करण्याचा ठराव मांडला. ही संधी साधत शिवसेनेचे सदस्य प्रमोद सावंत यांनी आयुक्तांवर अविश्वासाचा ठराव मांडण्याची सूचना केली.

अजय मेहता हे भाजपाच्या मर्जीतले मानले जातात. गेल्या वर्षभरात आयुक्तांनी शिवसेनेच्या कारभाराला चांगलाच लगाम घातला आहे. त्याचवेळी सागरी मार्गासारखे भाजपाचे प्रकल्पही पुढे सरकवले आहेत. आयुक्तांबरोबरच मुख्य लेखापरीक्षक, शिक्षणाधिकारी अशी पदे राज्य सरकारमार्फत भरून शिवसेनेची कोंडी करण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्तांना परत पाठवून भाजपाला शह देण्याचे मनसुबे सेनेने आखले आहेत. यावर स्थायी समितीमध्ये वादळी चर्चेनंतर विरोधकांनी अविश्वासाचा ठराव मांडल्यास त्याला पाठिंबा देण्याची भूमिका फणसे यांनी जाहीर केली. त्यानुसार छेडा यांनी आयुक्तांविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याची तयारी दाखवली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages