मुंबई, दि. 20 ऑक्टोबर 2016:
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये भाजपशी युती तोडण्याचा शिवसेनेचा सूर दिसून येतो. मात्र, स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी सरकारमधील युती तोडून दाखवावी, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.
गुरूवारी दुपारी राहता येथे प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी शिवसेनेवर तोफ डागली. ते म्हणाले की, शिवसेना स्वाभिमानाचा कितीही आव आणत असली तरी प्रत्यक्षात त्यांना भाजपकडून पदोपदी अपमान सहन करावा लागतो आहे. केवळ सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली असून, लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी युती तोडण्याचे इशारे दिले जात आहेत.
यंदाच्या पहिल्या 9 महिन्यांत म्हणजे सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यात 2322 शेतकरी आत्महत्या झाल्यासंदर्भातही त्यांनी भाजप-शिवसेना सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, गेल्या वर्षी याच काळात 2262 शेतकरी आत्महत्या होत्या. याचाच अर्थ सरकारने केलेल्या घोषणा फोल ठरल्या असून, त्याचा शेतकऱ्यांना पुरेसा फायदा झालेला नाही. त्यामुळेच आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसून येत आहेत.
वारंवार मागणी झाल्यानंतही भाजप-शिवसेना सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत असताना त्यांना थेट भरीव आर्थिक मदत दिली नाही. विविध नैसर्गिक संकटांमुळे हातातील पिके गेल्यानंतरही शेतकऱ्यांना पुरेशी नुकसानभरपाई दिली नाही. कसाबसा जो शेतीमाल पिकला, त्याला भाव मिळाला नाही. शासकीय खरेदी केंद्रे सुरू केली नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावाने शेतीमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट केल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यातील ही वस्तुस्थिती स्वीकारायला सरकार तयार नाही. ते केवळ घोषणा करण्यातच व्यस्त आहेत. खोटी स्वप्ने अन् खोटे दिलासे दिले जात आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्या करणार नाही तर दुसरे काय करणार? असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे शाप घेऊन महाराष्ट्र बदलणार नाही. खेडी उद्धवस्त करून स्मार्ट सिटी होणार नाहीत, असेही त्यांनी सरकारला बजावले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण नापिकी व कर्जबाजारीपणा आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी केल्याशिवाय शेतकरी आत्महत्या कमी होणार नाहीत. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने कर्जमाफीची घोषणा करावी. सरकारने कर्जमाफी केली नाही तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही विखे पाटील यांनी दिला.