मुंबईच्या विकास आराखड्यासाठी ६ महिने मुदत वाढ मागणार - यशोधर फणसे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2016

मुंबईच्या विकास आराखड्यासाठी ६ महिने मुदत वाढ मागणार - यशोधर फणसे

मुंबई / 15 Oct 2016 - मुंबईच्या सन २०१४ ते २०३४ या २० वर्षाचा विकास आरखड्याचे काम सुरु आहे. विकास आराखड्याबाबत २ महिने सूचना व हरकतीवर सुनवाई घेतली जाणार आहे. याच दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होणार असल्याने ६ महिने मुदत वाढ मिळावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिली.

मुंबईच्या विकास आराखडा बनवण्यात आल्यावर त्यावर ५५ हजारावर हरकती व सूचना आल्या होत्या. यामुळे हा आराखडा रद्द करून नव्याने आरखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आराखड्यातील चुका सुधारण्यात येऊन नव्याने पुन्हा आराखडा सादर करण्यात आला. नव्या आराखड्यावरही तब्बल १४ हजार सूचना व हरकती आल्या आहेत. या सूचना व हरकतींवरील सुनवाई दोन महिने चालणार असून सोमवार १७ ऑक्टोबर पासून सुनवाई घेतली जाणार आहे. 

सोमवार १७ ऑक्टोबर पासून पहिले ५ दिवस सरकारी यंत्रणा, त्यानंतर ३ दिवस इन्स्टिट्यूशन, २ दिवस खासदार आमदार व नगरसेवक, ४ दिवस एनजीओ, तर २१ दिवस स्थानिक वॉर्ड मधील सूचना व हरकतीवर सुनावणी घेतली जाणार आहे. यामध्ये खासदारांच्या २४, आमदारांच्या व माजी आमदारांच्या ८९, नगरसेवकांच्या २५ सूचना व हरकती आल्या आहेत यावर दोन दिवस सुनावणी घेतली जाणार आहे. मुंबई शहर विभागातील २५ तर उपनगरातील १९३ सूचना व हरकती आल्या आहेत याचीही सुनवाई घेतली जाणार आहे अशी माहिती फणसे यांनी दिली.

सध्या विकास आराखडा राज्य सरकारकडे पाठवण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर आहे. सोमवार पासून सूचना व हरकतीवर सुनवाई सुरु होणार असून १५ डिसेंबर पर्यंत दोन महिने सुनवाई घेतली जाणार आहे. यानंतर २ महिने पालिका सभागृहात या आराखड्यावर चर्चा केली जाणार आहे. जानेवारी दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता असून निवडणूका फेब्रुवारीमध्ये होऊ शकतात यामुळे पालिकेला आरखडा राज्य सरकारकडे पाठवण्यास उशीर लागणार आहे. यामुळे २६ नोव्हेंबर पासून आणखी ६ महिन्याचा कालावधी वाढवून मिळावा असा प्रस्ताव आयुक्तांना आणण्यास सांगितला आहे. तसा प्रस्ताव सादर केल्यावर सभागृहात त्याला मंजुरी देऊन आराखड्यास आणखी ६ महिन्याचा कालावधी वाढवून देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली जाईल अशी माहिती यशोधर फणसे यांनी दिली.

Post Bottom Ad