राणीबागेतील एका पेंग्वीन मादीचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राणीबागेतील एका पेंग्वीन मादीचा मृत्यू

Share This
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीबाग) करोडो रुपये खर्चून आणलेल्या एका हम्बोल्ट पेंग्वीन मादीचा रविवारी सकाळी 8.17 वाजता मृत्यू झाला. ती पाच दिवसांपासून आजारी होती. त्यामुळे तिची न्यूझिलंड येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी करून तिच्यावर उपचारही सुरू केले; पण त्याला यश न आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हट्टासाठी राणीबागेत सेऊल, दक्षिण कोरिया या थंड प्रदेशातून 26 जुलै 2016 मध्ये 3 नर व 5 मादी असे आठ पेंग्वीन आणण्यात आले. 18 ऑक्टोबरला सकाळी 8.30 वाजता हम्बोल्ट या 3 किलो वजनाची ग्रीन ब्ल्यू रंगाची पेंग्वीन मादी सुस्त असल्याचे दिसून आले. तिच्या विष्ठेचा रंगही हिरवा होता. भूक कमी झाल्याने तिला श्‍वसनाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. पेंग्वीनच्या आरोग्याची काळजी व व्यवस्थापन याविषयी प्रशिक्षण घेतलेले न्युझिलंडचे तज्ञ डॉक्टर तिच्या सेवेला होते. त्यामुळे त्यांनी तातडीने तीच्या विष्ठेचे नमुने तपासून कल्चर सेन्सिटिव्हीटी चाचणी त्वरीत करण्यात आली. यात ग्राम निगेटीव्ह जिवाणूंचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. हा जिवाणू एन्रोफ्लॉक्सेसिन या प्रतीजैविकास संवेदनशील असल्याचे तपासणीअंती कळले. त्यानुसार विदेशी पक्षीतज्ञांशी सल्लामसलत करून लगेचच योग्य ते उपचार सुरू करण्यात आले. पण पेंग्वीन उपचारास प्रतीसाद देत नव्हता.

19 ऑक्टोबरला पेंग्वीच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यात यकृतामध्ये संसर्ग झाल्याचे दिसून आले. तज्ञांच्या सूचनेनुसार पेंग्वीनचे एक्स-रे व अल्ट्रासोनोग्राफी करण्यात आली.त्यानंतर वेगवेगळे उपचार करूनही पेंग्वीनला औषध लागू होत नव्हती. अखेर 23 ऑक्टोबरला सकाळी 8.17 वाजता तिचा मृत्यु झाला. पेंग्वीनचे परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथोलॉजी विभागाच्या प्राध्यापकांच्या सहाय्याने शवविच्छेदन करण्यात आले. परंतू त्यांच्या मृत्युबाबतचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर समजू शकेल, असे पालिकेकडून सांगण्यात आले. दरम्यान पेंग्वीनना प्राणीसंग्रहालयातील क्वारंटाईन क्षेत्रात ठेवण्यात आले आहे. ही सुविधा आंतराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार तयार करण्यात आली आहे. क्वारंटाईन क्षेत्रात 16 ते 18 डीग्री सेल्सियस तापमान आहे. त्याशिवाय किचन, एल. एस. एस. सुविधा येथे असल्याचे राणीबाग व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages