राज्य मार्गांवरील पथकर 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत माफ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2016

राज्य मार्गांवरील पथकर 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत माफ

मुंबई, दि. 9 : केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूकदारांना अडचणी येऊ नयेत यासाठी महाराष्ट्रातील सर्व राज्यमार्गांवरील टोल टॅक्स (पथकर) 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यात मुंबईत येणारे एन्ट्री पॉईंट्स आणि मुंबई शहरातील टोलनाक्यांचा सुद्धा समावेश आहे.

मुंबई मेट्रोकडून 500 आणि 1000 रूपयांचे चलन स्वीकारले जात नाही, अशा काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मुंबई मेट्रोला हे चलन स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यांनीही अनुकूल कार्यवाहीचे आश्वासन सरकारला दिले आहे. या निर्णयामुळे आता चलनाच्या समस्येमुळे सामान्यांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

बँक आणि पोष्टामध्ये 500 व 1000 रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारण्याची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि गृहिणींच्या पैशाला कोणतीही बाधा येणार नाही. वैध मार्गाने मिळविलेला पैसा सुरक्षित राहणार असून त्यामुळे जनतेने गोंधळून जाऊ नये, तसेच गर्दी करू नये. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आपण सर्वांनी मिळून स्वागत करुया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Post Bottom Ad