नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी 20716 तर नगराध्यक्षपदासाठी 1533 अर्ज वैध - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी 20716 तर नगराध्यक्षपदासाठी 1533 अर्ज वैध

Share This
70 टक्के नामनिर्देशनपत्रे संगणकप्रणालीद्वारे प्राप्त
मुंबई, दि. 10: राज्यातील पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या 165 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 3 हजार 750 जागांसाठी एकूण 24 हजार191 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली असून त्यापैकी 20 हजार 716 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत; तर थेट नगराध्यक्ष पदाच्या 147 जागांसाठी 2 हजार 374नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. त्यापैकी 1 हजार 533 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. यातील सुमारे 70 टक्के नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे संगणक प्रणालीद्वारे प्राप्त झाली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चार टप्प्यात या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील 25जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबर, 2016 रोजी मतदान होत आहे. त्यासाठी 29 ऑक्टोबर 2016 पर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत होती. बहिष्कारामुळे शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही.

नामनिर्देशनपत्रे संगणक प्रणालीद्वारे भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता; परंतु काही ठिकाणी वीज पुरवठा आणि इंटरनेटबाबत अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांची दखल घेऊन कोणीही नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यापासून वंचित राहून नये, यासाठी अखेरचे दोन दिवस पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली होती. आता उर्वरित तीन टप्प्यांसाठी मदत कक्ष, ई-म्युटेशन सुविधा इत्यादी उपाययोजना अधिक प्रभावी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी कोणत्याही अडचणी उद्‌भवणार नाहीत,असा विश्वासही सहारिया यांनी व्यक्त केला.

नामनिर्देशनपत्रांच्या माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध नामनिर्देशनपत्राबाबत न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 11 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपीलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होईल, अशीही माहिती सहारिया यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages