सर ज.जी. कला, उपयोजित व वास्तुशास्त्र महाविद्यालयांना स्वायत्तत्ता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2016

सर ज.जी. कला, उपयोजित व वास्तुशास्त्र महाविद्यालयांना स्वायत्तत्ता

मुंबई / प्रतिनिधी
मुंबई येथील सर ज. जी.कला महाविद्यालय, सर ज.जी. उपयोजित महाविद्यालय आणि सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालय या तिन्ही शासकीय संस्थांना स्वायत्तता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे कला क्षेत्रात देशात नामांकित असलेल्या या शिक्षण संस्थेला विविध उद्योगांशी समन्वय साधून व्यवसायाभिमुख, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणे सुलभ होणार आहे.
जगभरातील शिक्षण व्यवस्थेत आणि त्यांच्या अभ्यासक्रमात बदत होत आहेत. त्यामुळे जुने व पारंपरिक शिक्षण अपुरे पडत असल्याने जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी या संस्थांना प्रशासकीय, आर्थिक व शैक्षणिक स्वायत्तता देणे गरजेचे होते. यामुळे संस्थांना विविध उद्योगांशी समन्वय साधून व्यवसायाभिमुख, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणे सुलभ होणार आहे.

या शासकीय संस्थेस स्वायत्तता मिळाल्यानंतर संस्था नोंदणी अधिनियम-१८६० अंतर्गत तसेच सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम अंतर्गत संस्थेची नोंदणी करावी लागणार आहे. संपूर्ण स्वायत्तता देताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संस्थेच्या व्यवस्थापकीय व प्रशासकीय संरचनेत बदल करावे लागणार आहेत. त्यानंतर त्यांच्यासाठी स्वतंत्र नियामक मंडळाची (Board of Governance)निर्मिती करावी लागणार आहे.

मंडळाचे अध्यक्ष हे दृश्यकलेतील नामांकित कलाकार किंवा नामांकित कला शिक्षणतज्ज्ञ किंवा नामांकित वास्तुशास्त्रज्ञ किंवा वास्तुशास्त्रातील नामांकित शिक्षणतज्ज्ञ असतील. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील नामांकित नियामक मंडळावर नेमणूक करण्यात येणार आहे. हे नियामक मंडळ संस्थेतील अभ्यासक्रमाच्या दर्जाबाबात, तेथील सोयी-सुविधा आदींबाबत शैक्षणिक मंडळ, विषय मंडळ, परीक्षा मंडळ, अर्थ समिती, खरेदी समिती,इमारत व बांधकाम सिमिती स्थापन करून त्यांच्या शिफारशीनुसार निर्णय घेईल.

Post Bottom Ad