मुंबई ( प्रतिनिधी ) - देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारामुळे वाभाडे निघत आहेत. एकीकडे भाजपा भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत असतानाच दुसरीकडे भाजपच्याच एका नेत्याच्या दबावाने पालिकेच्या सहायक आयुक्ताची तडकाफडकी बदली केल्याचा आरोप शिवसेनेसह विरोधी पक्षाने केल्याने खळबळ उडाली आहे. या विरोधात शनिवारी आर मध्य विभागातील नगरसेवक ठिय्या आंदोलन करणार आहेत. पालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्व नगरसेवक एकवटल्याने भाजप वादात सापडल्याचे चित्र आहे.
बोरीवली येथील आर- मध्य विभागातील सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांची गुरुवारी अतिक्रमण निर्मुलन (पूर्व उपनगरे) येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गांधी यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही त्यांची बदली करण्यात आली. त्यांचे आतापर्यंतचे काम समाधानकारक व प्रामाणिक अधिकारी असल्याने त्यांच्या झालेल्या या बदलीने नगरसेवकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या विरोधात शुक्रवारी मनसेचे नगरसेवक चेतन कदम, शिवसेनेच्या शीतल म्हात्रे, काँग्रेसच्या शीतल म्हात्रे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका संध्या दोषी, काँग्रेसचे शिवानंद शेट्टी यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन गांधी यांच्या बदलीबाबत विचारणा केली. भेटीच्या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर आयुक्तांनी गटनेत्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. डोंगरी एक्सल येथील पालिकेच्या प्लॉटवरील अनधिकृत बांधकामावर गांधी यांनी कारवाई केल्यानेच भाजपच्या एका नेत्याच्या दबावामुळे त्यांची बदली झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केला आहे. तर नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकाम विरोधात घेतलेल्या भूमिकेच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहतात तर दुसरीकडे राज्य सरकारमधील भाजपच्या एका मंत्र्याच्या दबावामुळे अधिका-याची बदली केली जाते ही भाजपची दुटप्पी भूमिका दिसून येत असल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक केतन कदम यांनी केला आहे. दरम्यान एका आमदाराच्या दबावामुळे कार्यक्षम अधिका-यांची बदल्या होत असेल तर हा त्यांचा मनोधेर्ये खच्चीकरण करण्याचा प्रकार आहे असे शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे.