महापालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या ठिकाणांबाबत लावणार १९० दिशादर्शक फलक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 November 2016

महापालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या ठिकाणांबाबत लावणार १९० दिशादर्शक फलक

मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महत्त्वाची ठिकाणे शोधणे नागरिकांना सोपे व्हावे, यादृष्टीने महापालिकेने १९० ठिकाणी दिशादर्शक फलक बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हे फलक व संबंधित बाबी या 'इंडियन रोड कॉन्ग्रेस' च्या मानकांनुसार असणार आहेत.


यापैकी ९० फलक हे मोठ्या आकाराचे असून १०० फलक हे छोट्या आकाराचे असणार आहेत. दादाभाई नौरोजी मार्ग, खान अब्दुल गफ्फार खान मार्ग (वरळी सी फेस रोड), सेनापती बापट मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, प्रा. ना. सी. फडके मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग यासह अनेक महत्त्वाच्या मार्गांवरती हे दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत. तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (गेट-वे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमाजवळ), वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो सिनेमा), हाजीअली जंक्शन, महाराणा प्रताप जंक्शन, कामगार रुग्णालय जंक्शन यासारख्या महत्त्वाच्या चौकांमध्येही दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) संजय दराडे यांनी दिली आहे.

महापालिकेद्वारे महत्त्वाच्या ठिकाणांबाबत लावण्यात येणारे दिशादर्शक फलक हे मोठ्या व छोट्या या दोन आकारांमध्ये असणार आहेत. यापैकी मोठ्या फलकामध्ये एकेरी व दुहेरी असे दोन प्रकारचे फलक लावण्यात येणार आहेत. मोठ्या फलकाचा आकार हा ४.५ मीटर लांबी व १.८ मीटर उंची असणार आहे. ज्या खांबावरती हे मोठे फलक बसविण्यात येणार आहेत, त्या खांबाची उंची ७.८ मीटर एवढी असणार आहे.
या प्रकारचे ९० मोठे दिशादर्शक फलक बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रामुख्याने रस्ते दुभाजकांवर खांब बसवून त्यावर लावण्यात येणार आहेत. यापैकी काही फलक हे खांबाच्या एकाच बाजूला एकेरी पद्धतीने, तर काही फलक हे खांबाच्या दोन्ही बाजूला दुहेरी पद्धतीने असणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व फलकांच्या पुढच्या बाजूला ठिकाणांची नावे असण्यासोबतच फलकाच्या मागील बाजूला जनजागृतीपर सामाजिक संदेश असणार आहेत. महापालिकेद्वारे एवढ्या मोठ्या आकाराचे दिशादर्शक फलक हे पहिल्यांदाच बसविले जाणार आहेत. तसेच हे फलक बसविण्यासाठी काही ठिकाणी क्रेनचाही वापर करावा लागणार आहे.

मोठ्या आकाराच्या ९० दिशादर्शक फलकांच्या माहितीला अनुरुप माहिती देण्यासाठी संबंधित पदपथांवर छोटे दिशादर्शक फलक देखील लावण्यात येणार आहेत. छोट्या आकाराच्या दिशादर्शक फलकांची रुंदी ही १.२ मीटर व लांबी १.८ मीटर एवढी असणार आहे. तर खाबांची उंची ही ३.९ मीटर एवढी असणार आहे. या दिशादर्शक फलकांवर प्रकाश परावर्तित करणा-या विशिष्ट प्रकारच्या रंगांचा वापर करुन महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती मराठी व इंग्रजी भाषेत नमूद करण्यात येणार आहे. या फलकांचा आधारभूत रंग (Base Colour) निळा असणार असून अक्षरांचा रंग (Font Colour) हा पांढरा असणार आहे.

या सर्व दिशादर्शक फलकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे फलक विशिष्ट प्रकारचे नटबोल्ट वापरुन रस्ते दुभाजकांवर वा पदपथांवर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात फलक किंवा फलक बसविलेला खांब निरुपयोगी झाल्यास केवळ निरुपयोगी झालेला भाग बदलविणे शक्य होणार आहे. ज्यामुळे तुलनेने अल्प कालावधीत व किमान खर्चात सदर काम शक्य होणार आहे. तसेच या कामासाठी रस्ते दुभाजक वा पदपथ खोदण्याची आवश्यकता देखील अत्यंत कमी प्रमाणात असणार आहे.

वरीलनुसार मोठ्या आकाराचे ९० दिशादर्शक फलक व छोट्या आकाराचे १०० दिशादर्शक फलक हे पुढील ३ महिन्यात बसविणे अपेक्षित असणार आहे. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेली मेट्रो रेल्वेची कामे, विविध उपयोगितांच्या वाहिन्यांचे जाळे (Utility Network) व अनुषंगिक बाबी यामुळे दिशादर्शक फलक बसविण्याच्या वेळापत्रकात व स्थानात काही अंशी बदल होऊ शकतो. तसेच काही बाबतीत वाहतूक पोलीस व 'पुरातन वारसा जतन समिती' (Heritage Committee) यांचे ना - हरकत प्रमाणपत्र देखील आवश्यक असणार आहे, अशीही माहिती प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) संजय दराडे यांनी दिली आहे.

Post Bottom Ad