शौचालय दिनाच्या निमित्ताने 'स्वच्छ सार्वजनिक शौचालय' स्पर्धा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 November 2016

शौचालय दिनाच्या निमित्ताने 'स्वच्छ सार्वजनिक शौचालय' स्पर्धा

उत्कृष्ट सार्वजनिक शौचालयांचा सन्मान तर अस्वच्छ शौचालयांना दंड
मुंबई / प्रतिनिधी 18 Nov 2016
मुंबईकरांना नागरी सेवासुविधा देणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करुन दिली आहे. या सार्वजनिक शौचालयांची दैनंदिन व्यवस्था बघण्यासाठी महापालिकेच्या संबंधित नियम व पद्धतींनुसार स्वयंसेवी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्वयंसेवी संस्थानी आपली जबाबदारी अधिक प्रभावीपणे व चांगल्याप्रकारे पार पाडावी, या उद्देशाने आणि दि. १९ नोव्हेंबर रोजीच्या जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या 'एफ दक्षिण' विभागातर्फे 'स्वच्छ सार्वजनिक शौचालय' स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती 'एफ दक्षिण' विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे. 

जागतिक शौचालय दिनानिमित्त परिमंडळ २ चे उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेच्या 'एफ/दक्षिण' विभागात 'स्वच्छ सार्वजनिक शौचालय स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. 'एफ/दक्षिण' विभागांमध्ये परळ (पूर्व), लालबाग, शिवडी, कॉटन ग्रीन, काळाचौकी, भोईवाडा आदी परिसरांचा समावेश होतो. या परिसरात महापालिकेच्या अखत्यारितील ४४ सार्वजनिक शौचालये आहेत. जागतिक शौचालय दिनानिमित्त या विभागात स्वच्छ सार्वजनिक शौचालय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निर्धारित मापदंडांच्या आधारवर या सर्व शौचालयांचे दि. १९ नोव्हेंबर २०१६ रोजी परिक्षण करण्यात येणार आहे.

या मापदंडांमध्ये शौचालयातील पाणी पुरवठा, वीज जोडणी, स्वच्छतागृहाच्या आतील व बाहेरील भिंती, शौचकुपांची - स्नानगृहांची - मुतारींची परिस्थिती, दुर्गंधीविषयक परिस्थिती, स्वच्छतागृहातील माहिती फलक व त्यावरील माहिती, सभोवतालचा परिसर, जंतुनाशक फवारणी, तक्रार नोंद वही, सभोवतालच्या परिसराची स्वच्छता यांचा समावेश असणार आहे. दिव्यांग नागरिकांसाठी, वरिष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी असणा-या सोयी सुविधा यांचीही समावेश स्पर्धेसाठीच्या मापदंडांमध्ये असून त्यानुसार देखील सर्व शौचालयांचे परिक्षण केले जाणार आहे.
>
> या स्पर्धेअंतर्गत सर्व ४४ शौचालयांचे निर्धारित मापदंडानुसार पहिले परिक्षण हे दिनांक १९ नोव्हेंबर २०१६ रोजी करण्यात येणार आहे. या अंतर्गत सर्व शौचालयांची ए, बी व सी अशा तीन प्रतवारींमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ज्या शौचालयांची प्रतवारी कमी असेल त्यांना प्रतवारी सुधारण्याचे मार्गदर्शन करण्यात येणार येऊन आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात येणार आहे. तसेच या एक महिन्यादरम्यान महापालिकेचे अधिकारी या शौचालयांना वेळोवेळी अचानक भेटी (Surprise Visit) देऊन शौचालयांचे परिक्षण करणार आहेत.
>
> एक महिन्यानंतर म्हणजेच दि. १९ डिसेंबर २०१६ रोजी दुसरे परिक्षण केले जाणार असून त्यानंतर या सार्वजनिक शौचालयांची अंतिम प्रतवारी निश्चित केली जाणार आहे. यानुसार ए प्रतवारी अंतर्गत ५ सार्वजनिक शौचालयांची निवड करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून त्यांना समारंभपूर्वक प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सम्मान करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आणखी एक वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे १९ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०१६ या कालावधी दरम्यान ज्या सार्वजनिक शौचालयांमध्ये वा शौचालयांच्या परिसरात अस्वच्छता आढळून येईल; त्या शौचालयाशी संबंधित स्वयंसेवी संस्थेवर 'क्लीनअप मार्शल' यांच्याद्वारे दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS