बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदूर्गनगरी - ओरोस येथे स्मारक व पत्रकार भवनाच्या बांधकामास मान्यता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 November 2016

बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदूर्गनगरी - ओरोस येथे स्मारक व पत्रकार भवनाच्या बांधकामास मान्यता

मुंबई, दि. 18 : पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदूर्गनगरी-ओरोस येथे स्मारक व पत्रकार भवनाच्या बांधकामास राज्य शासनाने मान्यता दिल्याची माहिती गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदूर्गनगरी-ओरोस येथे यथोचित स्मारक व्हावे अशी मागणी विविध पत्रकार संघटना तसेच सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघटनांच्या वतीने अनेक वर्षापासून करण्यात येत होती. पत्रकार संघटनांच्या मागणीनुसार वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर वित्त व नियोजन राज्यमंत्री केसरकर यांनी विधानपरिषदेत 18 मार्च, 2016 रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने सिंधुदूर्गनगरी-ओरोस येथे पत्रकार भवन उभारण्याकरीता आवश्यक आर्थिक सहाय्य शासनामार्फत उपलब्ध करुन दिले जाईल, अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने पालकमंत्री केसरकर हे स्मारकाच्या बांधकामास मंजूरीसाठी सातत्याने पाठपुरावा करीत होते.

राज्य शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदूर्गनगरी-ओरोस येथे यथोचित स्मारक व पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी 4 कोटी 55 लाख रुपयांच्या आराखड्यास व अंदाजपत्रकास ग्रामविकास व जलसंधारण विभागाने मान्यता दिली असून त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहितीही पालकमंत्री केसरकर यांनी दिली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारक व पत्रकार भवनास मान्यता दिल्याबाबत पालकमंत्री केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचेसह पत्रकार संघाचे प्रतिनिधी व पत्रकारांचे विशेष आभार मानले.

Post Bottom Ad