पालिकेच्या के.ई एम रुग्णालयात जुन्या नोटा बदलून मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या के.ई एम रुग्णालयात जुन्या नोटा बदलून मिळणार

Share This
मुंबई  15 Nov 2016 – केंद्र सरकारने अचानक देशभरात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्याने याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिनीवर आणि रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर होत आहे. यासाठी पालिकेच्या के. ई. एम रुग्णालयात जुन्या चलनातील या नोटा बदलून देण्यासाठी पंजाब नॅशनल बँक आणि भारतीय टपाल खाते यांनी विशेष सेवा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच, महापालिकेच्या इतर रुग्णालयातही बँक व टपाल खाते यांनी संमती दिल्यास ही विशेष सेवा सुरु करण्यासाठी पालिका प्रशासन जागा उपलब्ध करुन देणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

देशभरात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर अचानक बंदी आणल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल सुरु झाले आहेत. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना बँकांच्या बाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. यामध्ये रुग्णालयातील रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनाही पायपीट करावी लागत आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या अख्यात्यारीत असलेल्या के.ई.एम. रुग्णालयात प्रवेशद्वार क्रमांक २ येथे पंजाब नॅशनल बँकेच्या दादर शाखेने तर कामगार वाचनालयाजवळील उपहारगृहालगत भारतीय टपाल खात्याच्या दादर कार्यालयाने कक्ष सुरु केला आहे. या ठिकाणी जुन्या चलनातील ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलून देण्याची विशेष सेवा आज सकाळपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या कक्षासाठी पालिकेने विनामूल्य जागा दिली आहे. या रुग्णालयात येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयाचे कर्मचारी यांना प्राधान्याने या ठिकाणी जुन्या चलनी नोटांच्या बदल्यात नवीन चलन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याकरीता विहित पद्धतीने अर्ज भरुन देणे आणि इतर कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच, पंजाब नॅशनल बँकेची सुविधा सकाळी ११ ते दुपारी ४ तर टपाल खात्याची सुविधा सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत कार्यान्वित असणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना आणि कर्मचाऱ्याना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages