मुंबई : ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला आणि त्याचा पहिला फायदा मध्य आणि पश्चिम रेल्वेला झाला. ५00 आणि हजार रुपयांच्या नोटा घेऊन तिकीट आणि पास काढणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिकाधिक वाढत गेल्याने, अखेर रेल्वेलाच सुट्या पैशांचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे स्थानकांत प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात वादाचे चित्र दिसू लागले. एकंदरीत या सर्व गोंधळात मात्र, पश्चिम आणि मध्य रेल्वेला चांगलाच फायदा झाला. दोन्ही मार्गांवर महिन्याचा पास सोडता, अन्य पासांत मोठी वाढ झाली आणि एका दिवसांत १ कोटी ४ लाख ८४ हजार रुपये एवढी कमाई रेल्वेने केली.
५00 आणि १000 रुपयांच्या नोटा हद्दपार होणार असल्याने आणि त्या फक्त येत्या तीन दिवसांत रेल्वेत वापरू शकत असल्याने, अनेकांनी सकाळपासून रेल्वे स्थानकांवरच धाव घेतली. अनेकांनी या नोटा घेऊन तिकीट काढण्यापेक्षा पास काढणेच पसंत केले. ज्या प्रवाशांच्या पासाची मुदत संपण्यास एक किंवा दोन दिवस होते, अशा प्रवाशांनी त्वरित रेल्वस्थानक गाठले. त्यामुळे रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्या आणि एटीव्हीएमसमोर मोठमोठ्या रांगा लागल्या. मध्य रेल्वेवरील सीएसटी, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, हार्बरवरील वडाळा, जीटीबी, टिळकनगर, चेंबूर, मानखुर्द, वाशी, पनवेल, किंग्ज सर्कल तर पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मुंबई सेन्ट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी ते बोरीवलीसह नालासोपारा, मीरा रोड, भार्इंदर आणि विरार या स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. तिकीट आणि पास काढण्यासाठी तर अनेकांकडून ५00 आणि हजार रुपयांच्या नोटाच समोर केल्या जात असल्याने, रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना नकारही देता येत नव्हता. मात्र, सकाळपासून कमी असलेले याचे प्रमाण दुपारनंतर आणखी वाढत गेल्याने, रेल्वे प्रशासनासमोर मोठी डोकेदुखी निर्माण झाली. या नोटा घेऊन येणाऱ्या प्रवाशांना सुटे पैसे देण्यासाठी रेल्वेकडेच सुट्या पैशांचा खडखडाट जाणवू लागला. त्यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांत वाद होऊ लागले. स्थानकात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून रेल्वे पोलिसांचे मनुष्यबळही वाढवण्यात आले होते.