नवी दिल्ली : देशातील अर्थव्यवस्थेत बदलाच्या टप्प्यावर असताना ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानंतर आता लवकरच १००० रूपयांची नवी नोट चलनात आणली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच पुढील काळात सर्वच नोटा बदलून त्या चलनात आणल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
चलनातील सध्याची ५०० व १००० रूपयांची नोट रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. बुधवारपासून याची अंमलबजावणी झाली आहे. आज-गुरूवारी बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची रिघ लागली आहे. तसेच २००० रूपयांची नवी नोटही चलनात आली आहे. या पर्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत शक्तिकांत दास यांनी नवीन हजार रूपयाच्या नोटेसह सर्वच नोटा नव्याने चलनात येणार असल्याचे सांगितले. १ हजार रूपयांची नवीन नोट लवकरच चलनात आणली जाईल. ती नव्या रंगात आणि आकारात असणार आहे. अशा पध्दतीचे बदल आता सर्वच नोटांमध्ये केले जाणार आहेत.