महापालिका २००९ भरती व रिक्त पदे - ठोस भूमिका घेण्यास पालिका अपयशी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2016

महापालिका २००९ भरती व रिक्त पदे - ठोस भूमिका घेण्यास पालिका अपयशी

मुंबई महानगरपालिका जगातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखली जाते. एका छोट्या राज्यापेक्षा या महापालिकेचा अर्थसंकल्प मोठा आहे. एकेकाळी या महापालिकेच्या सेवेत १ लाख ४० हजारच्या वर कर्मचारी अधिकारी काम करत होते. हळू हळू हि संख्या कमी होत गेली आणि सध्या मुंबई महापालिकेत १ लाख ५ हजारच्या आसपास कर्मचारी अधिकारी काम करत आहेत. मुंबई महापालिकेत गेल्या कित्तेक वर्षात वेळोवेळी भरती प्रक्रिया पार न पडल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आली आहे.

मुंबई महापालिकेत २८ हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. या पैकी एससी, एसटी, ओबीसी या मागासवर्ग प्रवर्गातील रिक्त पदांची संख्या २० हजारहून अधिक आहे. माहिती अधिकातून रिक्त पदांची माहिती उघड झाल्यावर याबाबत पत्रकार म्हणून बातम्या व लेख लिहून पाठपुरावा केल्यावर माजी महापौर सुनिल प्रभू यांनी भर महापालिका सभागृहात २८ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. प्रभू यांचा कालावधी संपल्यावर सध्याच्या महापौर स्नेहल आंबेकर यांचाही अडीच वर्षाचा कालावधी संपत आला असाल तरी अद्याप या रिक्त पदांची भरती काही झालेली नाही.

मुंबई महापालिकेतील वेगवेगळ्या खात्यांमध्ये कामगार आणि आया या संवर्गातील पदे भरण्यासंदर्भात ३,९१६ जागांसाठी ६ नोव्हेंबर २००९ रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने २ लाख ८९ हजार २४८ अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये या सर्व अर्जाची प्राथमिक छाननी केल्यानंतर २ लाख ०८ हजार ५६५ अर्ज पात्र ठरले. यावेळी घेतलेल्या परीक्षेत ५ हजाराहून अधिक उमेदवाराना १०० पैकी १०० तर मोठ्या प्रमाणात उमेदवारांना ९९ ते ९० असे गुण मिळाले होते. विविध खाते, विभाग आणि रुग्णालयांमध्ये ३,९१६ कामगारांची नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर रुग्णालये आणि आरोग्य खाते यामधील कामगार, कक्ष परिचर आणि आया या रिक्त पदांमधील आवश्यकता लक्षात घेऊन याच २००९ मधील भरती मधील ८१५ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ७५२ उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. अशाप्रकारे २००९ मधील भरतीमधील ५,४८३ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली असून, उर्वरित उमेदवारांची गुणवत्ता यादी महापालिका प्रशासनाने जुलै २०१३ मध्ये रद्द केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या सेवेची स्वप्ने पाहणा-या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांचे स्वप्न भंग पावले आहे. उमेदवारांची वय जास्त झाली आहेत आता नोकऱ्या मिळणार कश्या यामुळे उमेदवारांनी गेले ३ वर्षे आपला लढा सुरु ठेवलं आहे.

मुंबई महापालिकेची २००९ मधील भरती हि काळी भरती होती असेच म्हणावे लागेल. या भरती दरम्यान परिक्षा घेताना उमेदवारांना परिक्षा हॉल मध्ये न बसवता एका गार्डन मध्ये बाजूबाजूला बसवून परिक्षा घेण्यात आली. मांडीला मांडी लावून बसलेल्या उमेदवारांनी आजू बाजूच्या उमेदवारांची उत्तरे बघून उत्तरे लिहिली आणि १०० पैकी १०० तर काहींनी ८०, ९० च्या पुढे मार्कस मिळवले. परिक्षा घेताना पालिकेच्या प्रशासनाने उमेदवार पारीख देताना कुठे आणि कसे बसवले आहेत ते कश्या प्रकारे एकमेकांची उत्तरे बघून लिहीत आहेत याकडे दुर्लक्ष केले.

जिकडे परिक्षा घेतली गेली त्या ठिकाणी दुर्लक्ष करून पालिका प्रशासन थांबले नाही. या परीक्षेत ५ हजारून अधिक उमेदवारांना १०० पैकी १०० मार्क्स तर बहुतेकी उमेदवारांना ८० , ९० मार्क्स कसे मिळाले याची चौकशी करावी असे पालिका प्रशासनाला वाटले नाही. महापालिकेला ३,९१६ पदांपैकी ३,९१६ पदे भरल्या नंतरही पालिकेने पालिकेने या भरतीमधील उमेदवारांची प्रतिक्षा तयार केली. या प्रतीक्षा यादीमधून नंतर दोन ते तीन वर्षे १५०० हुन अधिक उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. पालिकेला ३९१६ पदे भरायची असताना या भरती प्रक्रियेतून पालिकेने ५,४८३ उमेदवारांची नियुक्ती केली आहे.

एखादी परिक्षा घेतल्यावर त्यामधील उमेदवारांची प्रतीक्षा यादी हि काही कालावधी पुरता असते. कायमस्वरूपी ती प्रतीक्षा यादी राहू शकत नाही. असे झाल्यास त्यानंतर परिक्षा देणाऱ्या इतर उमेदवारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे जुलै २०१३ मध्ये २००९ मधील भरतीची प्रतिक्षा यादी रद्द करण्यात आली. प्रतिक्षा यादी रद्द केल्यावर उमेदवारांनी आझाद मैदानात आंदोलन केले. पत्रव्यवहार केला. पालिकेतील व इतर लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी घेऊन आपल्याला नोकरी कशी भेटेल यासाठी प्रयत्न केले. परंतू उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे ठोस आश्वासन दिले गेले नाही.

भरती प्रक्रियेतील प्रतिक्षा यादी रद्द केल्यावर पालिकेने या उमेदवारांना नोकरी देऊच असे कुठेही म्हटले नाही. याचा सरळ अर्थ आता नोकऱ्या मिळणार नाहीत असे असताना या २००९ भरती मधील उमेदवारांनी अपंगांची ५०० हुन अधिक पदे भरण्यास विरोध केला. इतर कुठलीही भरती करण्यापेक्षा आमचीच नियुक्ती पालिकेच्या रिक्त पदावर करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा देत २ नोव्हेंबरला पालिका मुख्यालया समोर आंदोलन केले. यावेळीही कोणतेही आश्वासन न देता आठ दिवसात काय ते कळवू इतकेच सांगण्यात आले. यानंतरही उमेदवार ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी या उमेदवारांना ताब्यात घेऊन मुख्यालय परिसरातून हुसकावून लावले आहे.

यासर्व प्रकारावरून आता नोकऱ्या मिळणार नाहीत हे उमेद्वारांना स्पष्ट झाले पाहिजे. आपली जी भरती होती त्या भरतीमध्ये कोणते प्रकार झाले, भरतीमध्ये जितके उमेदवार हवे होते त्यापेक्षा पालिकेने जास्त उमेदवार भरती केले आहेत, प्रतिक्षा यादी पालिकेने रद्द केली आहे याचा विचार उमेदवारांनी करायला हवा. पालिकेत कोणतीही भरती करताना आम्हालाच प्राधान्य द्या असे उमेदवारांचे म्हणणे सुद्धा चुकीचे ठरत आहे. २००९ च्या या भरतीमुळे पालिकेने कोणतीही मोठी भरती केलेली नाही. यामुळे पालिकेमध्ये आज २८ हजारहून अधिक पदे रिक्त आहेत, आपल्यामुळे अपंग असो व इतर कोणत्याही भरत्या करू नका असे म्हणणेही योग्य ठरणारे नाही याचा विचार करण्याची गरज आहे.

मुंबई महापालिका प्रशासनानेही २००९ मधील भरती प्रक्रियेमधील उमेदवारांना स्पष्ट उत्तर देण्याची गरज आहे. प्रशासनाच्या वेळ काढू वृत्तीमुळे हा प्रश्न चिघळत ठेवला जात आहे. २००९ च्या भरतीचा सोक्षमोक्ष पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी त्वरित लावावा. तसेच महापालिकेच्या सेवेतील मागासवर्गीयांच्या एससी, एसटी, ओबीसी, तसेच खुल्या प्रवर्गातील २८ हजार पदे रिक्त आहेत. माजी महापौर सुनील प्रभू यांनी दिलेल्या निर्देशा प्रमाणे अद्याप २८ हजार रिक्त पदे भरली गेली नाहीत. या रिक्त पदांच्या संख्येत गेल्या दोन वर्षात आणखी भर पडली असल्याने प्रशासनाने व आयुक्त अजोय मेहता यांनी रिक्त पदे भरण्याबाबत योग्य निर्णय त्वरित घेण्याची गरज आहे.

अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad