मुंबई 15 Nov 2016 - बोरिवली येथील मुंबई महानगरपालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरातील साफसफाई सेवा कामांसाठी खाजगी संस्थेला कंत्राट देताना येथील १२० मराठी कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम केले जात असल्याने सदर प्रस्तावाला विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी जोरदार विरोध दर्शविला . मात्र अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी पालिका धोरणानुसार खाजगी करणाच्या माध्यमातून काम देण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सदर प्रस्तावावर मतदान घेत हा प्रस्ताव मंजूर केला.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर संकुलातील साफसफाई सेवा कामांकरिता खाजगी कंत्राटदारची नेमणूक करण्याचा प्रस्ताव आला असता विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सदर प्रस्तावास विरोध केला , यावर बोलताना या ठिकाणी १२ वर्षे सेवा केलेले १२० मराठी कामगार काम करत होते त्यांना काढून टाकण्यात येऊन खाजगी कंत्रारदाराला साफसफाईचे कंत्राट देणे कितपत योग्य आहे , असा सवाल छेडा यांनी केला , यामुळे येथील मराठी कामगारांवर अन्याय करणारे ठरणारे असल्याचे त्यांनी सांगितले , यावर अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी पालिका धोरणानुसार यापूर्वीही खाजगी करणाच्या माध्यमातून असे निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले .