काळे धनवाले सोडून नागरिकांचेच सर्जिकल स्ट्राईक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 November 2016

काळे धनवाले सोडून नागरिकांचेच सर्जिकल स्ट्राईक

८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मध्य रात्री पासून रद्द करत असल्याचे जाहीर केले. हा धाडसी निर्णय ५६ इंचाच्या छाती असलेला प्रधानमंमंत्रीच घेऊ शकतो अशी पाठ थोपटून घेण्यात आली. काही मोदी भक्तांनी तर कहरच केला या आधीही कितीक वेळा नोटा बदली करण्यात आल्या त्याची माहिती न घेता असे भारतात पहिल्यांदाच होत असल्याचे तसेच मोदींचे काळ्या पैशां विरोधातले सर्वात मोठे सर्जिकल स्ट्राईक असे म्यासेज सोशल मिडियावर पसरवले. वास्तविक पाहता भारतात अशा प्रकारचा निर्णय ३८ वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. आणीबाणीनंतरच्या जनसमर्थनाच्या प्रचंड लाटेवर आरूढ होऊन सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई यांच्या जनता पक्षाच्या सरकारने अशाच प्रकारे दहा हजार, पाच हजार आणि एक हजार रुपयांच्या नोटा १६ जानेवारी १९७८ पासून चलनातून रद्द केल्या होत्या. 

पण त्या वेळी त्याचा लोकांना एवढा त्रास झाला नव्हता. याची प्रामुख्याने चार कारणे होती. एक म्हणजे, रद्द केलेल्या नोटांचे चलनातील एकूण नोटांमधील प्रमाण अगदीच कमी म्हणजे जेमतेम आठ टक्के होते. त्या वेळची अर्थव्यवस्था खूप लहान होती. त्यामुळे एकूण व्यवहार व उलाढाल कमी होती. त्यावेळी ९०-९५ टक्के लोकांनी उभ्या आयुष्यात दहा, पाच किंवा एक हजाराची नोट कधी पाहिलीही नव्हती. त्यामुळे या नोटा चलनात असल्या काय किंवा नसल्या काय याच्याशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. आजच्या तुलनेत तेव्हा रुपयाची क्रयशक्ती जास्त होती. त्यामुळे त्यावेळी या बड्या नोटा उभ्या आयुष्यात कधी हातात न घेताही बहुसंख्य नागरिकांचे संसाराचे गाडे सुरळितपणे हाकले जात होते. आज मोदींनी जो निर्णय घेतला तेव्हा ज्याच्याकडे ५०० आणि हजारांच्या नोटा सर्वांकडेच होत्या. यामुळे सर्वसामान्य लोकांना जुन्या चलनातील नोटा बदलून घेण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार भारतात ज्या काही चलनात नोटा आहेत त्यापैकी ८५ टक्क्याहून अधिक ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा होत होता. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार हा निर्णय झाला त्या दिवशी ५०० रुपयांच्या १६.५ अब्ज व एक हजार रुपयांच्या सहा अब्ज नोटा चलनात होत्या. मोदी यांच्या घोषणे नंतर एका फटक्यात देशातील ८५ टक्क्याहून अधिक चलन बाद झाले आहे. यासाठी काळा पैसा असल्याचे कारण दिले आहे. ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्याने काळा पैसा बाहेर येईल, काळ्या पैशांवर अंकुश लावता येईल अशी अनेक कारणे देण्यात आली आहेत. जुन्या नोटा बंद केल्यावर नव्या नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या रांगामध्ये सर्वसामान्य माणूस तासनतास उभा आहे. या रांगांमध्ये कोणीही काळे पैसे बाळगणारा उभा राहिलेला दिसत नाही यामुळे केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयानंतरही काळे धन बाळगणारे निश्चिन्त आहेत हे विशेष. 

केंद्र सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करताना या नोटांचे चलनातील प्रमाण ८५ टक्क्याहून अधिक आहे याचा विचार केलेला दिसत नाही. ८५ टक्के चलनातील नोटा बदलताना सरकारला त्या जागी काढण्यात आलेल्या नव्या ५०० आणि २००० च्या तसेच चलनातील १०, २०, ५०, १०० च्या नोटा पुरेश्या प्रमाणात बँकांमध्ये आणि एटीएम मध्ये उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या. परंतू धाडसी निर्णय घेणाऱ्या सरकारने पर्यायी नोटाच उपलबध न केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. बँकांमध्ये आणि पोस्टामध्ये पैसे बदलून घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. जुन्या नोटा घेण्याचे आदेश असतानाही पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन वरील तिकीट खिडक्या, रुग्णालये, मेडिकल इत्यादी ठिकाणी नागरिकांना बोलणी ऐकून घ्यावी लागत आहे. या ठिकाणी सातत्याने भांडणें होत आहेत.

केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेतला असताना नागरिकांना होणार त्रास कमी करण्यासाठी देशात कुठेही भाजपावाले धावून आलेले दिसत नाहीत. खुद्द प्रधानमंत्री नागरिकांचे हाल होत असताना परदेश दौऱ्यावर गेले आहेत. परदेशात जाऊन ज्या लोकांनी कधी गंगे मध्ये पैसे टाकले नाही तेच लोक आता आपले पैसे बाहेर काडून बँकेमध्ये टाकत आहेत असे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी साहेब सामान्य जनतेला पैशाचे महत्व असल्याने त्यांनी आपल्या आयुष्य भारताची कमाई जपवून ठेवली असते. हि कमाई अडीअडचणीला कामाला येईल म्हणून जपवून ठेवतात. अशी कमाई सामान्य नागरिक गंगेमध्ये टाकत नाहीत. जी कमाई पुढील आयुष्यासाठी आणि अडीअडचणीसाठी जम्पवून ठेवली होती ती कमाई खिश्यात हात घालून आपण काढून घेतली आहे. त्रास, रांगा, भांडणे यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हे आपल्या सारख्या सतत परदेशवारीवर असलेल्या प्रधानमंत्र्याला बहुतेक ठाऊक नसावे.

बर आपण ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्यावर किती काळे धन बाळगणाऱ्यानी काळे धन जमा केले याची माहिती दिलेली नाही. हि माहिती न देता आपले सरकार सामान्य नागरिकांनी किती विविध कर भरले बँकेमध्ये किती उलाढाल झाली हेच जाहीर करत आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यावर ज्वेलर्सवाल्यानी ३५ हजार तोळे असलेले सोने ४५ हजारापासून ५४ हजारापर्यंत विकले आहे. त्यासाठी सर्रासपणे जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारण्यात आल्या आहेत. मिडियाने हा काळा बाजार उजेडात आणल्यावर आपले इन्कम ट्याक्स डिपार्टमेंट या ज्वेलर्सच्या मागे लागली आहे. काळे धन ५०० आणि १००० च्या नोटांमध्ये बाळगणारे कमी लोक आहेत. काळे धन इतर संपत्ती आणि इतर ठिकाणीच जास्त आहे. हे काळे धन बाहेर काढण्यासाठी खरे सर्जिकल स्ट्राईक करायला हवे. विदेशात स्वीझ बँकेत मोठ्या प्रमाणात काळे धन आहे ते आणण्यासाठी हवे तसे प्रयत्न होताना दिसत नाही हीच मोठी शोकांतिका आहे.

"अबकी बार मोदी सरकार" असा नारा देत नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. मोदी यांचे सरकार सत्तेवर येताना भ्रष्टाचार मुक्त भारत करू असे म्हटले होते. भ्रष्टाचार आज हि सुरु आहे. काळे धन म्हणावे तसे बाहेर काढण्यात सरकारला यश आलेले नाही. काळ्या धनाच्या नावाने सामान्य जनतेला मात्र त्रास सहन करावा लागत आहे. ८५ टक्क्याहून अधिक चलनातील नोटा रद्द करताना लोकांना त्रास होऊ नये म्हणून तितकेच इतर पर्यायी चलन मार्केट मध्ये आणणे गरजेचे होते. असे न केल्याने सध्या चलनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सगळीकडे पैसे भरणे, काढणे, बदलणे यासाठी लोक ५ ते ८ तास रांगेत उभे राहत आहेत. याचाच परिणाम म्हणून मुंबई मधील मुलुंड येथील वर्तक नावांच्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा घेतल्या जात नसल्याने गोवंडी येथील एका ३ दिवसीय लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.मध्य प्रदेशमध्ये तरपुर शहरातील मातवाना मधील मथुरा प्रसाद अहिरवार या महिलेचे अंतिम संस्कार करता आलेले नाहीत. याचा वचपा नागरिक सरकारवर काढतील याची जाणीव सरकारने ठेवायला हवी.

अजेयकुमार जाधव
मोबाईल - ९९६९१९१३६३

Post Bottom Ad