मुंबई / प्रतिनिधी - 9 Nov 2016
केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रकमेचे चलन वापरासाठी बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून राज्य शासनाने पुर्णत: नियोजन केले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळित चालावेत या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने येत्या शनिवारी आणि रविवारी ( १२ आणि १३ नोव्हेंबर २०१६ ) बँकांचे कामकाज सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यामळे प्रामाणिक लोकांनी घाबरण्याचे कारण नसून लोकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकार सर्वोतपरि सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली. मंत्रालयात वित्त विभागाच्या मुख्या सचिव व अधिकाऱी आणि रिझर्व बॅंकेच्या अधिकाऱ्यांच्या नियोजन बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.सुधिर मुनगंटीवार म्हणाले, या पूर्वीही 2014 साली रिझर्व बॅंकेने सन 2005 अगोदरच्या 500 च्या नोटा रद्द केल्या होत्या असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, देशात 2 रूपये ते 1 हजार रूपये पर्यंतच्या चलनी नोटांची किंमत 16 लाख 41 हजार 500 कोटी आहे. त्यापैकी पाचशे व हजार रूपयांच्या नोटांची किंमत 14 लाख 18 हजार कोटी आहे, तर मुंबईत मागच्या वर्षी म्हणजे 1 जाने 2014 ते 31 डिसें 2014 या कालावधीत 5 कोटी 98 लाख 43 हजार 20 रूपये किंमतीच्या व डिसेंवर 2015 पर्यंत 1 कोटी 45 लाख रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असल्याचे मुनंगटीवार यांनी सांगितले.
सर्व शेड्युल्ड, नॉन शेड्युल्ड बँका, सार्वजनिक, खाजगी आणि विदेशी बँका, सहकारी, प्रादेशिक आणि ग्रामीण तसेच स्थानिक क्षेत्रिय बँका आणि त्यांच्या शाखा दि. १२ आणि १३ नोव्हेंबर २०१६ रोजी सुरु राहतील असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, आजमितीस सर्व बँकांकडे चार ते पाच दिवस पुरेल एवढे ५० आणि १०० रुपयांचे चलन उपलब्ध आहे शिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तीन दिवस पुरेल एवढा ५० आणि १०० रुपयांचा चलनसाठा उपलब्ध आहे. अशी माहिती देऊन मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक झोनमध्ये तीन गाड्या आणि तीन अतिरिक्त अधिकारी चलन पुरवठ्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. दि. ११ नोव्हेंबर २०१६ पासून बँकांवर येणारा कामाचा ताण लक्षात घेऊन जनतेच्या सोयीसाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेच्या आत एक तास अगोदर बँक कामकाजासाठी हजर राहण्याच्या सूचना झोनल अधिकाऱ्यामार्फत देण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील सर्व पोलीस घटकांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे आढावा घेतला असून कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओकॉनफरंसिगद्वारे बॅंक कामकाजाच्या सुलभतेच्यादृष्टीने व कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत.
बँकेकडील अतिरिक्त कामाचा बोजा लक्षात घेऊन सर्व बँक शाखांमध्ये अतिरिक्त काऊंटर्स व अतिरिक्त कारकून देण्याची सूचना झोनल अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्व बँकांनी या कामकाजाकरिता नोडल अधिकारी नेमला असून आवश्यक मनुष्यबळ व इतर आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व बँक शाखामधून याबाबत माहिती देणारे बॅनर्स दर्शनी जागेवर लावावेत, जेणेकरून सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पर्यटनस्थळी गेलेल्या पर्यटकांकडे तसेच तीर्थक्षेत्री गेलेल्या भाविकांकडे आवश्यक चलन उपलब्ध नसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पर्यटन तसेच धार्मिक क्षेत्रातील सामाजिक संस्थांनी संबंधितांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत असल्याची माहिती ही वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.
सरकारी दवाखान्यांप्रमाणे खाजगी दवाखान्यांमध्ये आणि औषधालयांमध्ये ही दि. ११ नोव्हेंबर २०१६ पर्यंत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्यमार्गावरील टोलनाक्यांवर दि. ११ नोव्हेंबर २०१६ पर्यंत टोलमाफी देण्यात आल्याचेही वित्तमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मार्गदर्शक सूचना
१. जून्या चलनातील नोटा खातेदारास त्याच्या बँक खात्यात किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ३० डिसेंबर २०१६ पर्यंत जमा करता येतील
२. रुपये ४००० पर्यंत ची जुन्या चलनातील रक्कम विनंती अर्जाच्या स्लीप व ओळखपत्रासह बँकेत किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडे जमा करता येईल. ही सुविधा सर्व पोस्ट ऑफीसमध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
३. रुपये ४ हजार पर्यंतची मर्यादा वाढवण्यासंदर्भात पुढील १५ दिवसामध्ये आढावा घेऊन आवश्यकतेनुसार निर्णय घेतला जाईल
४. ज्या बँक शाखेत व्यक्तीचे खाते आहे त्या बँक शाखेच्या खात्यामध्ये स्वत: रक्कम जमा करण्यास बँक खातेदारास उच्चतम रकमेची मर्यादा नाही. तथापि ज्या प्रकरणामध्ये खातेदाराचे KYC झालेले नाही अशा परिस्थितीत रक्कम ५० हजार च्या मर्यादेत जुन्या चलनाच्या नोटा जमा करता येतील.
५. बँकेच्या कोणत्याही शाखेतून ही रक्कम भरण्याची सोय बँकेच्या प्रचलित नियमानुसार व ओळखपत्र दाखवून उपलब्ध असेल.
६. त्रयस्थ व्यक्तीच्या बँक खात्यावर जुन्या चलनातील नोटा जमा करावयाच्या असल्यास अशा परिस्थितीत मुळ खातेदाराचे अधिकृत पत्र ओळखपत्र जोडून अशी रक्कम जमा करता येऊ शकेल.
७. बँक खातेदारास दि. २४ नोव्हेंबर २०१६ रोजी संपणाऱ्या पंधरवड्यापर्यंत १० हजार रुपये एका वेळी परंतु २० हजार प्रति आठवडा अशा मर्यादेत रोख रक्कम बँकेतून काढता येईल.
८. दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोगात असलेल्या नॉन कॅश व्यवहारावर (जसे धनादेश, धनाकर्ष, क्रेडिट डेबिट कार्ड, मोबाई व्हॅलेटस आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रोख हस्तांतरण) यावर कोणतेही निर्बंध नाहीत.
९. दि. १८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत खातेदारास त्याच्या एटीएममधून प्रति दिवशी २ हजार प्रति कार्ड यानुसार रक्कम काढता येईल. दि. १९ नोव्हेंबर २०१६ नंतर ही मर्यादा वाढवून रुपये ४ हजार प्रति दिन प्रति कार्ड याप्रमाणे असेल
१०. दि. ३० डिसेंबर २०१६ पर्यंत ज्यांना बँकेमध्ये किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून जुन्या चलनातील नोटा बदलून घेता आल्या नाहीत त्याना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विशिष्टि कार्यालयात बदलण्याची व्यवस्था उपलब्ध असेल.
११. चलनातील बदलामुळे जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शासकीय खाजगी रुग्णालये, औषधालये, रेल्वे तिकिट खिडकी, शासकीय सार्वजनिक वाहतूकीचे तिकिटघर, वायू सेवेची तिकिट खिडकी, ग्राहक सहकारी सोसायटी, दुग्धालये, पेट्रोल पंप अशा ठिकाणी जुन्या चलनातील नोटा ७२ तासांपर्यंत वापरात येऊ शकतील.