
मुंबई, दि. 9 : बनावट नोटा आणि काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी पाचशे आणि हजारच्या चलनाला व्यवहारातून हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या लढाईमुळे कायदेशीर मार्गाने पैसा कमविणाऱ्या नागरिकांनी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पंतप्रधानांनी काल रात्री चलनी नोटासंदर्भात घेतलेल्या दूरगामी परिणाम करणाऱ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमांमध्ये व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने राज्यातील जनतेने घाबरून जाऊन बँकांमध्ये विनाकारण गर्दी करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.
हा निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयामुळे देशाच्या विकासातील मोठा अडथळा दूर होणार असून यामुळे देश विकासाकडे जाणार आहे. सामान्य माणसांनी या निर्णयाच्या पाठीशी उभा राहिले पाहिजे. या निर्णयाबाबत काहीजण घाबरून प्रतिक्रिया देत आहेत. या निर्णयामुळे खऱ्या मार्गाने पैसा कमविणाऱ्यांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. कायदेशीररित्या कमावलेला सर्व पैसा सुरक्षित असून त्याबद्दल कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही,असेही ते म्हणाले.
ज्यांच्याकडे काळा पैसा किंवा बेकायदेशीररित्या कमावलेला पैसा आहे तेच लोक या निर्णयामुळे अडचणीत येणार असून सामान्य माणसांनी घाबरण्याचे, गोंधळण्याचे कारण नाही. बँकेत नोटा बदलून दिल्या जातील. त्याकरिता तब्बल 50 दिवसांचा पुरेसा कालावधी देखील देण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी बँकेत विनाकारण गर्दी करू नये. आपले जे रोजचे व्यवहार आहेत ते व्यवहार आपण जसेच्या तसे होतील असे सांगून या ऐतिहासिक निर्णयाला सगळ्यांनी समर्थन द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.