माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं निधन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2016

माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं निधन

मुंबई, दि .7 - भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७७ वर्षांच्या होत्या. 1962 पासून राजकरणात सक्रीय असणा-या जयवंतीबेन मेहता यांनी नगरसेविकेपेसून ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला. वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी ऊर्जामंत्रीपद भुषवलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयवंतीबेन मेहतांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शिवाजी पार्क स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

जयवंतीबेन मेहता गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयवंतीबेन मेहता या 1996 ते 1999 च्याकाळात वाजपेयी सरकारमध्ये उर्जाराज्यमंत्री होत्या. यासह भाजपची अनेक महत्वाची पदं जयवंतीबेन मेहता यांनी भूषवली होती.

जयवंतीबेन यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व गमावले : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 7 : माजी केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांच्या निधनाने पक्षातील मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, मेहतायांनी नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्री म्हणून केलेलेकार्य पथदर्शी आहे. मुंबईच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्या नेहमी आग्रही भूमिका घेत. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी नेहमी वंचित आणि उपेक्षित घटकांच्या उन्नतीचा आणि विकासाचा विचार केला. त्यांच्या संघटनकौशल्यामुळे महिला कार्यकर्त्यांच्या दोन पिढ्या राजकीय क्षेत्रात सक्रीय झाल्या.जनतेच्या प्रश्नाप्रति अंत्यंत संवेदनशीलतेने कार्य करणारे आणि कार्यकर्त्यांसाठी कायम मार्गदर्शकाची भूमिका निभावणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे 
भारतीय जनता पार्टीच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांच्या निधनाने पक्ष एका समर्पित कार्यकर्ता व ज्येष्ठ मार्गदर्शकास मुकला आहे, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेश उपाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी अर्पण केली.

महाराष्ट्र भाजपातर्फे मा. जयवंतीबेन मेहता यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते म्हणाले की, जयवंतीबेन मेहता यांनी जनसंघाच्या काळात पक्षाच्या कामाला सुरुवात केली. एक समर्पित व शिस्तबद्ध कार्यकर्ती म्हणून त्यांनी पक्षामध्ये सर्व पातळ्यांवर काम केले. दहा वर्षे मुंबई महापालिकेच्या नगरसेविका, दोन टर्म विधानसभा सदस्य तर तीन टर्म लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी लोकांचे प्रतिनिधित्व केले. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, पक्षाच्या राष्ट्रीय सचिव, भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अशा पदांवर त्यांनी पक्षामध्ये कार्य केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी मनापासून पार पाडली. जनसंघ व भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल काळ होता त्यावेळी पक्षाचा जनाधार बळकट करणार्‍या नेत्यांपैकी त्या एक होत्या. त्यांच्याकडे पक्षकार्याचा व सक्रीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता. त्यांच्या मार्गदर्शनाचा पक्षाला लाभ होत होता. त्यांच्या निधानाने पक्षाने एक समर्पित कार्यकर्ता व मार्गदर्शक गमावला आहे.

संघर्षाचा बुलंद आवाज आणि भूलेश्वरची भवानी हरपली - अॅड आशिष शेलार
भारतीय जनता पार्टीच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांच्या निधनाने आमचा संघर्षाचा बुलंद आवाज आणि भूलेश्वरची भवानी हरपली आहे, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

जयवंतीबेन मेहता म्हणजे पक्षनिष्ठ शिस्तबद्ध कार्यकर्त्या आणि तडफदार भाषण कौशल्य यामुळे त्या भूलेश्वरची भवानी म्हणून लोकप्रिय होत्या. त्या ज्या काळात राजकारणात आल्या तो काळ स्त्रियांसाठी अवघड होता. त्यामुळे त्यांचा जीवन प्रवास हा नव्या पिढीला मार्गदर्शक असा आहे.

दहा वर्षे मुंबई महापालिकेत नगरसेविका, दोन टर्म आमदार तर तीन टर्म खासदार तर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, पक्षाच्या राष्ट्रीय सचिव, भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अशा पदांवर त्यांनी पक्षामध्ये कार्य केले. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Post Bottom Ad