एफ उत्तर विभागातील 32 धार्मिकस्थळाना पालिकेच्या नोटीसा
मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईतील अनधिकृतपणे उभरलेल्या धार्मिकस्थळांना मुंबई पालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. एफ उत्तर विभागातील 32 धार्मिकस्थळांना नोटीस बजाविण्यात आल्या असून त्यापैकी प्रतीक्षानगर येथील एका मंदिरावर गुरुवारी पहिली कारवाई करण्यात आली.
गेल्या ५६ वर्षांपूर्वी प्रतीक्षानगर येथील ओम शिवशक्ती मरियम्मन मंदिर उभारले होते. तामिळ भाषिकांचे हे धार्मिकस्थळ असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या मोठ्या जलवाहिनीवर आहे. ते हटविण्यासाठी महापालिकेने न्यायालयात धाव घेतली. दरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने पंधरा दिवसापूर्वी ओम शिवशक्ती मरियम्मन मंदिर विश्वस्तांना धार्मिकस्थळ अनधिकृत असल्याची नोटीस बजावली. या नोटीसनंतर धार्मिकस्थळ वाचविण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले. परंतु न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे पालिकेने वडाळा टी टी पोलिसांच्या मदतीने गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून धार्मिकस्थळ जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कारवाईला विरोध करणाऱ्याना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. दरम्यान, मुंबईत विविध ठिकाणी अनधिकृतपणे धार्मिकस्थळ उभारली आहेत. त्यामध्ये एफ उत्तर विभागात 32 धार्मिकस्थळ असून ते हटविण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले आहेत. या आदेशानुसार अनधिकृत धार्मिकस्थळाना नोटीस बजाविण्यात आली आहे, असे पालिका एफ उत्तर विभागातून सांगण्यात आलं आहे