मुंबई, दि.17 : पाणीपट्टी व विद्युत देयकाची वसूली करण्यासाठी जुन्या 500 व 1000 रुपये मुल्याच्या नोटा स्विकारण्यास जलसंपदा विभागाने अनुमती दिली असून या नोटा 24 नोव्हेंबर पर्यंत स्विकारल्या जातील, असे एका अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केले आहे.
जलसंपदा विभाग व विभागाच्या अधिनस्त सर्व क्षेत्रित कार्यालये व सर्व सिंचन विकास महामंडळे यांना दिनांक 8 नोव्हेंबर,2016 पूर्वीच्या देयकापोटी येणे असलेल्या पाणीपट्टीच्या (सिंचन,बिगर सिंचन) देय/थकीत रकमा रोखीने जुन्या चलनात स्विकारण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यानुसार वसूल करावयाची रक्कम ही दिनांक 8 नोव्हेंबर, 2016 पर्यंत वा तत्पूर्वीच्या देयकाची असावी. 8 नोव्हेंबर, 2016 नंतरच्या करापोटी आगाऊ रकमांचा भरणा स्वीकारल्या जाणार नाहीत. भरणा करण्यात येणारी रक्कम ही कोणत्याही परिस्थितीत ना-परतावा राहणार असून तशी कल्पना संबंधितास देण्यात येईल. विवादित रकमा अथवा प्रतिसाक्षित रकमा स्वीकारल्या जाणार नाहीत. त्रयस्थ पक्षाने भरणा करण्याची मागणी केल्यास वैध पुराव्यासह त्याच्या ओळखीची पडताळणी केली जाईल. पाणीपट्टी व विद्युत देयकाची वसूली दिनांक 24 नोव्हेंबर, 2016 च्या मध्यरात्रीपर्यंत अनुज्ञेय राहणार आहे. भरणा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रिय कार्यालये, महामंडळे यांना विविध उपाययोजना करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आल्याचे जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.