महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिकेने दर्जेदार नागरी सेवा सुविधा पुरवाव्यात – महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 November 2016

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिकेने दर्जेदार नागरी सेवा सुविधा पुरवाव्यात – महापौर

मुंबई / प्रतिनिधी - 8 Nov 2016
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनांक ६ डिसेंबर, २०१६ रोजी ६० व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका दर्जेदार नागरी सेवा - सुविधा पुरविणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारही सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
चैत्यभूमी स्मारक (दादर पश्चिम) येथे पुरविण्यात येणाऱया विविध नागरी सेवा - सुविधांबाबत मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांनी आज (दिनांक ८ नोव्हेंबर, २०१६) महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, पोलिस अधिकारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी यांची संयुक्त बैठक आयोजित केली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातून येणाऱया लाखों अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क परिसरांत दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध नागरी सेवा - सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उप महापौर अलका केरकर, विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मिठबांवकर, बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा यामिनी जाधव, ‘जी/उत्तर’ प्रभाग समितीचे अध्यक्ष सुधीर जाधव, नगरसेविका समिता कांबळे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. अविनाश सुपे, उप आयुक्त (परिमंडळ - २) आनंद वागराळकर, संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त, संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच संबंधित विविध अधिकारी आणि भन्तेजी, विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिनासाठी महापालिका प्रशासनाद्वारे देश-विदेशातून येणाऱया अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क परिसरात विविध सेवा-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. ‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी बैठकीदरम्यान महापालिका प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात येणार असलेल्या सेवा-सुविधांचे व नियोजनाचे संगणकीय सादरीकरण केले. याबाबत सर्व उपस्थितांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक करीत प्रशासनाने मागील दोन वर्षांपासून उत्तमोत्तम पुरविलेल्या सेवा-सुविधांबाबतही कौतुक केले.

महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरील कार्य व लौकिक पाहता त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसह सर्वांनाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आदर व आदर्श आहे. प्रत्येकाला त्यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी काही ना काही करावे, असे वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायांना दर्जेदार नागरी सेवा - सुविधा देण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. मागील दोन वर्षांपासून या सेवा - सुविधांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून त्याचा दर्जाही उत्तम आहे. महापालिका प्रशासनदेखील या नागरी सेवा - सुविधा देताना कोणतीही कसर ठेवत नाही. महापालिका प्रशासनाने नागरिकांनी केलेल्या सुचनांची शहानिशा करुन त्या अंमलात आणण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, तसेच चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दर्शनासाठी येणाऱया महिलांसाठीही स्वतंत्र अशी आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देशही महापौर आंबेकर यांनी प्रशासनाला दिले.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यावेळी म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६० वा महापरिनिर्वाण दिन योग्यरित्या पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने अनेकवेळा बैठका घेऊन योग्य पद्धतीने नियोजन केले आहे. ६० व्या महापरिनिर्वाण दिनी येणाऱया लाखो अनुयायांसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. यादृष्टीने आवश्यक ती साधनसामुग्री व पुरेशा कर्मचाऱयांचीही व्यवस्था केली आहे. पोलिस यंत्रणेशी समन्वय साधून त्यांना आवश्यक असलेली साधनसामुग्री पुरविण्यात आली असून यापुढेही आवश्यक ते सहकार्य केले जाणार आहे. विविध संघटना यांचे पदाधिकारी, स्वयंसेवक व समता सैनिक दल यांच्याशी समन्वय साधून हा महापरिनिर्वाण दिन व्यवस्थित पार पाडावा, याकरीता प्रशासन कर्तव्यदक्ष आहे. शिवाजी पार्क परिसरात नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करताना याठिकाणी भोजनदान करणाऱया संस्थांसाठी नियमावली बनविण्यात येणार आहे. चैत्यभूमी, शिवाजी पार्क या ठिकाणी देण्यात येणाऱया सेवा-सुविधांसोबत कुर्ला स्थानक, राजगृह, सिद्धार्थ वसतिगृह याठिकाणीही आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी यावेळी आश्वासित केले.

Post Bottom Ad