मुंबई / अजेयकुमार जाधव - १४ नोव्हेंबर २०१६
मुंबईकर नागरिकांची दुसरी लाईफ लाईन असलेली बेस्ट तोट्यात आहे. बेस्टवर आर्थिक संकट असून या संकटातून मार्ग काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाचे मोकळे भूखंड, इमारतीवरील गच्च्या मोबाईल कंपन्यांना टॉवर उभारण्यास भाडे तत्वावर देणार आहे. मोबाईल टॉवर्स उभारण्यासाठी बेस्टने १४० ठिकाणे देण्याचे निश्चित केली असून या माध्यमातून पुढील १० वर्षात बेस्टला ६६ कोटी ६९ लाख रुपये इतके उत्पन्न मिळेल असे अपेक्षित आहे.बेस्टवर तब्बल चार हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. बेस्टने ४२ लाख प्रवासी प्रवास करत असत. बेस्टने केलेल्या तिकिटांच्या दरवाढी नंतर प्रवाश्यांची संख्या कमालीने घातली आहे. सध्या बेस्टने २९ ते ३० लाख प्रवासी प्रवास करत आहे. यामुळे बेस्टकडे येणारे आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे. बेस्टला टीडीएलआरच्या माध्यमातून ६५० कोटी रुपये मिळत होते, टीडीएलआरही बंद केल्याने बेस्टवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी बेस्टने विविध मार्ग स्वीकारला असून त्यापैकीच उपक्रमाचे मोकळे भूखंड, इमारतीवरील गच्च्या मोबाईल कंपन्यांना टॉवर उभारण्यास भाडे तत्वावर दिले जाणार आहेत.
बेस्टने टॉवर उभारण्यास १४० ठिकाणे १० वर्षे भाडेतत्वावर देण्याचे निश्चित केली आहेत. या १४० ठिकाणांसाठी टेंडर काढण्यात आले होते. यापैकी सुयोग्य टेलिमॅटिक्स लिमिटेडने ६५ ठिकाणी तर रिलायंस जिओ इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीने ८ अश्या ७३ विशिष्ठ ठिकाणांवर टॉवर उभारण्यास रस दाखवलं आहे. सुयोग्य टेलिमॅटिक्स कडून बेस्टला वर्षाला २ कोटी ७५ लाख तर रिलायंस जिओ कडून बेस्टला वर्षाला ३६ लाख भाडे मिळणार आहे. दरवर्षी बेस्टला १० टक्के अधिक दराने भाडे मिळणार असून पुढील १० वर्षात मोबाईल टॉवरच्या माध्यमातून बेस्टला ४९ कोटी ७२ लाख उत्पन्न मिळणार आहे.
१४० पैकी ७३ जागा निश्चित केल्यावर उर्वरित जगांपैकी २३ ठिकाणे १ कोटी ६ लाख रुपये वार्षिक भाडे या दराने मोबाईल टॉवर्ससाठी देण्याचे बेस्टला अपेक्षित आहे. या २३ ठिकाणी मोबाईल टॉवर्स उभारण्यासाठी रिलायंस जिओ इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीने बोली लावली आहे. २३ ठिकाणे मोबाईल टॉवरसाठी भाड्यावर दिल्याने बेस्टला दरवर्षी १० टक्के जास्त भाडे मिळणार असून पुडे १० वर्षात १६ कोटी ९७ लाख रुपये इतके उत्पन्न मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने बेस्ट समिती समोर सादर केला आहे.