विनानियोजन नोटाबंदीच्या निर्णयातून मोदींची हुकूमशाही - अबु आझमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विनानियोजन नोटाबंदीच्या निर्णयातून मोदींची हुकूमशाही - अबु आझमी

Share This
मुंबई : १४ नोव्हेंबर २०१६
भारतीय चलनातील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर आणलेली बंदी हा विना नियोजन घेतलेला निर्णय असून मोदी सरकारच्या या मनमानीपणाच्या निर्णयातून त्यांची हुकूमशाहीच दिसत असल्याची टीका समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबु आझमी यांनी केली आहे. सध्या सर्व देश अनुभवत असलेली गोंधळाची परिस्थिती हेच मोदी सरकारचे अच्छे दिन आहेत का, असा संतप्त सवालही त्यांनी विचारला आहे.
लोकसभा निवडणुकीपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले अच्छे दिनाचे आश्वासन दूरच राहिले, उलट मोदी सरकारने घेतलेल्या नोटा बंदीच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे हालच होत आहेत. या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत असून देशभरातील दैनंदीन व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व लोक आपापली कामे सोडून बँकांबाहेरच्या रांगांमध्ये नोटा बदलण्यासाठी उभे आहेत. एक प्रकारची आर्थिक आणिबाणीच सारा देश अनुभवतो आहे. कोणताही संवेदनशील निर्णय घेताना आपत्कालिन परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी प्रत्येक सरकार आपत्कालिन नियोजन करत असते. मात्र नोटाबंदीच्या या निर्णयाचे कोणतेही आपत्कालिन निर्णय मोदी सरकारने केले नसल्याबद्दलही मा. आझमी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही नियोजनाशिवाय घेतलेला हा निर्णयच मोदींची हुकूमशाही वृत्ती दाखवून देत असल्याचेही ते म्हणाले. सुरूवातीला हा निर्णय जाहीर करताना दोन ते तीन दिवस सामान्यांना त्रास होईल असे पंतप्रधान म्हणाले होते. आता आणखी पन्नास दिवस द्या असे ते म्हणत आहेत. त्यांची सतत बदलणारी ही वक्तव्ये लोकांमध्ये अधिक गोंधळाची परिस्थिती निर्माण करत आहेत, असे सांगत मा.आझमी यांनी नोटाबंदीचा हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages