मुंबई / मुकेश श्रीकृष्ण धावडे - 9 Nov 2016
धारावीतील धोबीघाट पादचारी पुलावर रोज होणाऱ्या अपघातामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक रहिवाश्यांनी चक्क वर्गणी गोळा करून सरकारी पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सदर पादचारी पूल दुरुस्त करण्यासाठी स्थानिक समाजसेवक एन.आर. पॉल यांनी पुढाकार घेतला असून ते स्वतः या कामात जातीने लक्ष घालत आहेत. पुलाच्या अर्ध्या भागाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित भागाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रशासनाच्या दुटप्पी धोरणामुळे या पादचारी पुलाचे काम रखडले होते. वारंवार तक्रारी करूनही रेल्वे, पालिका तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीनी याकडे कानाडोळा केला होता. त्यामुळे पुलाची अवस्था दयनीय झाली होती. जिन्याच्या लोखंडी पट्ट्याचे वेल्डिंग तुटून त्या वर आल्या होत्या. व जिन्याचे टप्पे झिजले होते. त्यामुळे पादचाऱ्यांना रोज जीव मुठीत घेऊन चढ उतार करावी लागत होती. परिणामी पुलाच्या जिन्यावरून घसरून पडण्याच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली होती. साधारण चार महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने पुलाच्या पूर्वेकडील (शीव) भागातील जिन्याचे काम करून त्या भागाचे शुशोभीकरण केले होते. मात्र धारावीकडील पश्चिमेच्या भागाकडे डुंकूनही पहिले नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी स्वतः या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
रेल्वे पादचारी पूल दुरुस्त करण्यासाठी स्थानिक रहिवाश्याकडून सिमेंट, लोखंडी पट्या तसेच वर्गणी गोळा करून करण्यात आले. आतापर्यंत 60 हजार रुपये इतका खर्च झाला आहे. स्थानिक समाजसेवक एन.आर. पॉल यांनी पुढाकार घेतल्याने स्थानिक रहिवाशी तसेच दुकानदारानी मोलाची मदत केली. सरकारी मालमत्ता स्थानिक रहिवाश्यानी दुरुस्त केल्याची हि पहिलीच घटना मुंबईतील असावी. असे स्थानिक नागरिक अयुब शेख यांनी सांगितले