मुंबई 15 Nov 2016 -
केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपये मुल्याच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द केल्याने राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन जनसामान्यांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात शिफारसी करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
केंद्र सरकारने दिनांक 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपये मुल्याच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जनसामान्यांना येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने विविध निर्णय घेतले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळालेला आहे. अजुनही त्याबाबत काही उपाययोजनांची गरज भासल्यास मंत्रिमंडळाची ही उपसमिती त्याबाबत सरकारला शिफारसी करणार आहे. तसेच सरकारने याबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावाही ही समिती घेईल. या समितीत अर्थमंत्री, कृषीमंत्री, शिक्षणमंत्री, सहकारमंत्री, परिवहनमंत्री आदींचा समावेश असेल.