महापालिका आयुक्तांची मासिक आढावा बैठक संपन्न - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिका आयुक्तांची मासिक आढावा बैठक संपन्न

Share This
मुंबई / प्रतिनिधी
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महापालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आज सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षातील अनुभवावरुन असे लक्षात आले आहे की, महापालिका क्षेत्रातील काही ठराविक रस्त्यांवर पावसाळ्यादरम्यान तुलनेने अधिक प्रमाणात खड्डे पडतात. अशा प्रकारच्या नेहमी खड्डे पडणा-या ठिकाणांची (क्रॉनिक स्पॉट)यादी संबंधित सहाय्यक आयुक्तांनी तयार करावी. सदर यादी परिमंडळीय उपायुक्तांच्या मार्फत प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) यांच्याकडे पाठवावी. तसेच रस्ते विभागाने या बाबींचा तांत्रिक अभ्यास करुन व योग्य त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन पुन्हा-पुन्हा खड्डे पडणार नाहीत, यादृष्टीने पुढील कार्यवाही करावी.

मुंबईतील वाहन तळांची समस्या लक्षात घेऊन कुठे-कुठे भूमिगत वाहनतळ तयार करता येऊ शकतील, याचा अभ्यास करुन त्याबाबतचे अहवाल सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी सादर करावेत, असेही आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. पर्यटकांना व नागरिकांना महापालिका क्षेत्रातील पर्यटन स्थळे व ऐतिहासिक स्वरुपाची वारसास्थळे यांची संक्षिप्त माहिती सहसजपणे मिळावी, या उद्देशाने अशा सर्व ठिकाणी त्या-त्या स्थळांची योग्य माहिती नामफलकासह प्रदर्शित करावी, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान दिले.

महापालिका क्षेत्रातील समुद्र किना-यांवर काही नियमांमुळे सार्वजनिक शौचालये सहजपणे बांधता येत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन अशा सर्व ठिकाणी उच्च दर्जाची फिरती शौचालये तैनात करण्यात यावीत. तसेच ही शौचालये प्राधान्याने सीएसआर निधीचा वापर करुन उपलब्ध करुन घ्यावीत, असेही महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान सूचित केले. महापालिकेत कामगार, कर्मचारी वा अधिकारी यांची नेमणूक करण्यासह त्यांची कार्यदायित्वे निश्चित करण्याबाबत सुधारित मनुष्यबळ विकास धोरण तातडीने तयार करणे व राबविणे अतिशय आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन याबाबत तातडीने अभ्यासात्मक अहवाल सादर करण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages