2018 पर्यंत 400 रेल्वे स्टेशन्स वायफायने सुसज्ज करण्याचे लक्ष्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

2018 पर्यंत 400 रेल्वे स्टेशन्स वायफायने सुसज्ज करण्याचे लक्ष्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share This
रेल्वे, गुगल इंडिया, एमटीएनएलसह आदींनी सर्वंकष आराखडा तयार करावा
मुंबई, दि. 19 Dec 2016 : सन 2018 पर्यंत 400 रेल्वे स्टेशन्स वायफायने सुसज्ज करण्याचे लक्ष्य आहे, हे साध्य करण्यासाठी रेल्वे, गुगल इंडिया, एमटीएनएल, बीएसएनएल आदी यंत्रणांनी सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.


वर्षा निवासस्थानी रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देण्याबाबतच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीला माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांच्यासह रेल्वे, रेलटेल, एमटीएनएल आदी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करण्यासाठी आणि 400 रेल्वे स्टेशन्स वायफायने सुसज्ज करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अंमलबजावणी समिती गठीत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

भारतीय रेल्वेची  रेलटेल कंपनी आणि गुगल इंडिया यांच्यात झालेल्या सांमजस्य करारानुसार गुगल इंडिया रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देत आहे. यावेळी गुगल इंडियाचे गुलझार आझाद यांनी वायफाय एकत्रिकरणाबाबत सादरीकरण करून माहिती दिली. बैठकीला पश्चिम रेल्वेचे रेलटेलचे वरिष्ठ संचालक व्ही.एस.ताहिम, महाव्यवस्थापक इंदिरा त्रिपाठी, अतिरिक्त महाव्यवस्थापक सुभाष चंद्रा आदी उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages