अडीच वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या लांबीत तिपटीने वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अडीच वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या लांबीत तिपटीने वाढ

Share This
सुमारे 8 हजार किमी महामार्गांना नवीन एनएच क्रमांक
नागपूर/ 19 डिसेंबर
केंद्रात मे 2014 मध्ये देशात सत्तेत आलेल्या एनडीए सरकारने सुरू केलेला विकास कामांचा झपाटा वेगाने पुढे जात आहे. सत्तेत आल्यानंतर केंद्रीय रस्ते विकास परिवहन विभागाने राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी तिपटीने वाढवून 15 हजार किलोमीटरपर्यंत रस्त्यांच्या कामांना नव्याने मंजुरी दिली. केंद्रीय रस्ते विकास, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच हा निर्णय शक्य झाला आहे. 


सडक परिवहन मंत्रालयाने तत्वत: प्रशासकीय मंजुरी दिलेल्या 4 राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी 14509 किमी असून या मंजुरीचे आदेश अनुक्रमे 8 सप्टेंबर 2015, 3 डिसेंबर 2015, 28 मार्च 2016 आणि 4 ऑक्टोबर 2016 या तारखांना दिले आहेत. या सर्व कामांचे सविस्तर प्रकल्प आराखडे बनविण्याचे काम सुरु असून या कामांच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. यापैकी 3630 किमी लांबीच्या 21 हजार 453 कोटींच्या कामाची निविदा 30 नोव्हेंबर 2016 आणि 2 डिसेंबर 2016 रोजी प्रत्यक्षात काढण्यात आली असून येत्या दोन महिन्यात कामांना सुरुवात होणार आहे.

या सर्व राष्ट्रीय महामार्गांना नवीन एनएच क्रमांक देण्यासाठी कारवाई सुरु आहे.  यापैकी 7928 किमीच्या रस्त्यांना नवीन एनएच क्रमांक देण्याची कारवाई पूर्ण झाली आहे.  या कामांना 16 डिसेंबर 2016 ला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे.  तसेच 1462 किमी पर्यंतच्या भारत माला, पर्यटन, मागासक्षेत्र, धार्मिक क्षेत्र या रस्त्यांची कामे एनएचआयला हस्तांतरित करण्यात आली आहेत.  या कामांच्या सविस्तर प्रकल्प आराखडयाचे काम सुरु आहे.  सन 2014 मध्ये अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे अंदाजे 1500 किमी रस्त्यांची कामे एनएचआयला हस्तांतरित करण्यात आली असून या रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प आराखडेही तयार करण्यात आले असून भूसंपादनाची कारवाई सुरु आहे.

महाराष्ट्रात केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत आजपर्यंत 470 रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजूर देण्यात आली असून या रस्त्यांची किंमत 5667 कोटी रुपये आहे.  या कामांच्या निविदाही प्रसिध्द झाल्या आहेत.  एवढेच नव्हे तर अनेक जिल्हयांमध्ये या रस्त्यांची कामेही सुरु झाली आहेत. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, प. महाराष्ट्र, खानदेश अशा सर्वच भागांमध्ये केंद्रीय रस्ते विकास परिवहन मंत्रालयाने मंजूर केलेले नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार केले जात आहेत.  या रस्त्यांना नवीन एनएच क्रमांकही देण्यात आले आहेत

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages