मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिका छत्रपती शिवाजी टर्मिनस व पालिका मुख्यालय इमारत या दोन्ही ऐतिहासीक इमारती परिसरात पर्यटकांना सेल्फी काढता यावी यासाठी स्वतंत्रपणे सेल्फी पॉईंट उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता पर्यटकांना ऐतिहासीक इमारतींसोबत सेल्फी काढणे सोयीचे ठरणार आहे. या कामासाठी सुमारे ८० लाख ४५ हजार २०८ रूपये खर्च करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस हे युनोस्कोने राज्यातील ऐतिहासीक रेल्वे स्थानक म्हणून घोषित केले आहे. तसेच सीएसटी रेल्वे स्थानकाची इमारत ही ताजमहाल नंतर छायाचित्रणासाठी देशातील प्रेक्षणिय इमारत म्हणून ओळख आहे तसेच त्या लगत असणारी महापालिकेची मुख्य इमारत ही सुध्दा देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. या दोन्ही ऐतिहासीक ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी पर्यटक येत असतात. संपूर्ण इमारतीसह आपला सेल्फी टिपण्यासाठी भर रस्त्यात उभ राहून पर्यटक सेल्फी काढीत असतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन पर्यटकांच्या जिविताला धोका होऊ शकतो. हे लक्षात घेऊन महापालिकेने सीएसटी सब वेच्या वरील भागात पर्यटकांसाठी सेल्फी पॉईट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्याची व्हेंन्टीलेशन यंत्रणा अद्यावत करण्यात येणार आहे. तसेच सीएसटी जवळील भाटीया बागेचे सुशोभिकरण केले जाणार आहे. हा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीपुढं मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.